सुकळीविर शिवारात बिबट्याचे ठसे; वनविभाग आणि ग्रामस्थांनी दिवसभर घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 02:26 PM2021-06-08T14:26:10+5:302021-06-08T14:31:49+5:30
Leopard footprints in Suklivir Shivara : वनविभागाच्या माहितीनुसार साेमवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या या परिसरातून निघून गेला
डोंगरकडा ( हिंगोली ) : वारंगा परिमंडळातीळ सुकळीविर बीट शिवारात ७ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अंकुश धुमाळे यांनी शेतात बिबट्या आढळून आल्याची माहिती गावकऱ्यांना सांगितली. दिवसभराच्या शाेधानंतर साेमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बिबट्या निघून गेला असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
सुकळीविर परिसरात बिबट्या दिसून आल्याची माहिती गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, वनपाल ज्ञानेश्वर मुंढे यांना भ्रमणध्वनीवरून सांगितले. यानंतर वनपाल मुंढे व वनरक्षक संतोष कचरे हे सुकळीविर शिवारात दाखल झाले. गावकरी व शेतकऱ्यांशी चर्चा करून परिसरातील पाहणी केली. यादरम्यान शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले. यावरून बिबट्याचा शोध घेतला असता, तो या परिसरातील एका उसाच्या फडात लपून बसला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या शिवारातील शेतकरी व मजुरांना येथून घरी जाण्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
बिबट्या हा प्राणी एका जागी जास्त वेळ थांबत नाही. गावकरी व परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरू नये परंतु सतर्कता बाळगावी. बिबट्या दिसल्यास त्याची तत्काळ द्यावी. आखाड्यावरील पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. परिसरात वनविभागाचे वनरक्षक संतोष कचरे परिसरात गस्त घालून पाहणी केली. मात्र बिबट्या आढळून आला नाही. नंतर ७ जूनच्या रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बिबट्या सुखरूप निघून गेला असल्याचे वनपाल मुंढे यांनी सांगितले.