चिमुकलीला आपटून मारणाऱ्या पित्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 03:21 PM2020-01-23T15:21:37+5:302020-01-23T15:24:50+5:30
तीन वर्षांच्या मुलीस पायाला धरून जमिनीवर आपटले.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे पत्नीला मारहाण करून तीनवर्षीय मुलीला जमिनीवर आपटून ठार मारणाऱ्या विश्वनाथ कुंडलिक पांढरे या पित्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी २२ जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
१० फेब्रुवारी २०१७ रोजीच्या रात्री ११.३० वाजेच्या सुमारास म्हाळशी येथे विश्वनाथ कुंडलिक पांढरे याने पत्नी रेणुकाबाईला ‘तु मला खर्चाला पैसे का देत नाहीस’ या कारणावरून वाद घालून मारहाण केली. तसेच त्यांची तीन वर्षांची मुलगी ईश्वरी हिच्या पायाला धरून जमिनीवर आपटले. यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागला. याबाबत कोणाला सांगितले तर तुला जिवे मारून टाकीन, अशी रेणुकाबाईस धमकी देत जखमी मुलीस घरात कोंडून ठेवले. यातून सुटका करून तिला वाशिम येथे रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. रेणुकाबार्इंच्या तक्रारीवरून विश्वनाथ पांढरेविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. फौजदार ए.एल. चिलांगे यांनी तपास करून हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून २२ जानेवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी.शिंदे यांनी विश्वनाथ पांढरे यास जन्मठेप व १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सक्तमजुरी, तसेच कलम ३२४ नुसार एक वर्षे कारावास व २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरी, कलम ३४१ नुसार एक महिनास कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील एन.एन. मुटकुळे, एस.डी. कुटे, एस.एस. देशमुख यांनी काम पाहिले.