लाकडाने मारहाण करून गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 08:01 PM2024-10-09T20:01:42+5:302024-10-09T20:02:03+5:30

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Life imprisonment for the husband who killed his pregnant wife by hitting her with a wood | लाकडाने मारहाण करून गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

लाकडाने मारहाण करून गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

हिंगोली : सात महिन्यांच्या गरोदर पत्नीला लाकडाने मारहाण करून तिचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप व १० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एन. माने - गाडेकर यांनी ९ ऑक्टोबर रोजी सुनावला.

सेनगाव तालुक्यातील सवना तांडा येथील अर्चना कचरू ऊर्फ रंगनाथ दिपके ही सात महिन्यांची गरोदर असताना तिला लाकूड, काठीने मारहाण करण्यात आली. यात गंभीर जखमी झालेल्या अर्चनाचा मृत्यू झाला. ही घटना २२ ऑक्टोबरची रात्री ते २३ ऑक्टोबर २०१५ च्या पहाटेदरम्यान घडली. याप्रकरणी मयत अर्चनाची आई सखूबाई लक्ष्मण धवसे यांनी २३ ऑक्टोबर रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात लग्नानंतर काही दिवसांनी अर्चनाला पती व सासरच्या मंडळींकडून ऊस तोडीची उचल फेडण्यासाठी वडिलांकडून १० हजार रूपयांची मागणी करीत त्रास दिला जात होता, असे म्हटले. त्यावरून पोलिसांनी मयत अर्चनाचा पती कचरू रंगनाथ दिपके, सासरा विठ्ठल कचरू दिपके, सासू अरूणाबाई विठ्ठल दिपके यांच्यासह सुमित्राबाई लक्ष्मण धबाले, आनंदा भालेराव, गौतम बनसोडे (सर्व रा. सवना तांडा, ता. सेनगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला. याप्रकरणाचा तपास करून पोलिसांनी हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एन. माने - गाडेकर यांच्या न्यायालयात चालले.

९ ऑक्टोबर रोजी न्या.माने- गाडेकर यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून कचरू ऊर्फ रंगनाथ विठ्ठल दिपके यास कलम ३०२ भादंविनुसार दोषी ठरवून जन्मठेप व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास तसेच कलम ४९८ (अ) मध्ये ३ वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर पुराव्याअभावी इतर पाच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता एन.एस. मुटकुळे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. एस.डी. कुटे, ॲड. एस.एस. देशमुख, ॲड. जी.व्ही. घुगे, कोर्ट पैरवी पी.ए. मार्कड यांनी सहकार्य केले.

Web Title: Life imprisonment for the husband who killed his pregnant wife by hitting her with a wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.