झाड तोडले म्हणून जिवघेणा हल्ला करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा
By विजय पाटील | Published: August 19, 2023 06:37 PM2023-08-19T18:37:15+5:302023-08-19T18:37:37+5:30
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथे शेतातील लिंबाचे झाड का तोडले म्हणून एकावर प्राणघातक हल्ला करून साक्षीदारावरही हल्ला करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. लोखंडे यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार सायंकाळी ८:३० च्या सुमारास कुबेरराव ग्यानबाराव हाके हे दुचाकीने घरी आले. दुचाकी लावत असतानाच शिवराज हाके हातात कोयता घेवून तेथे आला. त्याने कुबेर यांच्या मानेवर, कानावर, डोळ्यावर, हनुवटीवर, खांद्यावर, डाव्या दंडावर, पाठीमागे कोयताने वार केले. यावेळी महेश ऊर्फ दगडू ऊर्फ बाळू आप्पाराव हाके हे सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही कोयत्याने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला व हाताच्या अंगठ्याला मार लागला.
याबाबतची फिर्याद कुबेर यांचा मुलगा ग्यानोबा हाके यांनी बाळापुरात नोंदविली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फौजदार एच.डी. नकाते यांनी तपास केला. याप्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल केल्यानंतर अप्पर सत्र न्यायाधीश आर.व्ही. लोखंडे यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण चालले. यात सहायक सरकारी वकील सविता देशमुख यांनी एकूण १३ साक्षीदार तपासले. यात डॉ.उमेश देशपांडे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
या प्रकरणात १८ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निकालात शिवराज ऊर्फ बाळू हाके यास भादंविच्या कलम ३०७ नुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिने कठोर कारावसाची शिक्षा सुनावली. तर कलम ५०६ भादंविअन्वये ६ महिने शिक्षा व एक हजार रुपये दंड तर दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी सुनावली आहे. या प्रकरणात देशमुख यांना सरकारी वकील एस.डी. कुटे व एन.एस. मुटकुळे यांनी सहकार्य केले. कोर्टपैरवी म्हणून सतीश सातव व एस.एस. कोंडामंगल यांनी काम पाहिले.