लिगो प्रकल्पातील शेतकरी होणार मालामाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:06 AM2018-04-09T05:06:02+5:302018-04-09T05:06:02+5:30
लिगो इंडिया प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतक-यांना मूल्यांकनाच्या पाचपट रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून मिळणार आहे.
औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : लिगो इंडिया प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतक-यांना मूल्यांकनाच्या पाचपट रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये वनजमिनीशिवाय एकूण ४३ शेतक-यांच्या जमिनी जाणार असून यातील ४१ शेतकरी लखपती तर दोघे करोडपती होणार आहेत. येत्या १५ दिवसांत त्यांना हा धनादेश मिळणार आहे.
जगातील तिसरी ‘लेजर इंटरफेरोमेटर ग्रॅव्हीटेशनल-वेव्ह आॅब्जर्व्हेटरी’ अर्थात लिगो ही आंतराळातील लहरींचा शोध घेऊन त्यावर अभ्यास करणारी प्रयोगशाळा हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा परिसरात होत आहे. यामध्ये दुधाळा येथील ८६.९७, अंजनवाडा २८.८६, नंदगाव ४.१५, सावळी बै. १.८५, अशी एकूण १२१ हेक्टर आर. वनजमीन या प्रकल्पात जात आहे. लिगोच्या वतीने या जमिनीची मोजणी करून ताबा घेणे सुरू आहे. केंद्र शासनाकडून या जमिनीचे अधिकृत हस्तांतरण झाले नाही. हा प्रस्ताव मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्याकडे आहे.
>मूल्यांकनाच्या पाचपट रक्कम
दुधाळा येथील ३० हेक्टर ८० आर व सिद्धेश्वर येथील १४ हेक्टर ६३ आर एवढी जमीन खासगी मालकीची आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी आठ कोटींवर मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यावर जमा झाला आहे.
जागेवरच मिळणार मोबदला
उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या दालनात शनिवारी सिद्धेश्वर येथील शेतकºयांना बोलावून जमीन हस्तांतरणाची माहिती देण्यात आली. १५ दिवसांमध्ये शेतकºयांकडून जमीन लिगोच्या नावे करून घेतली जाईल.