प्रकाशाचा सणही यंदा अंधारातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:49 PM2018-11-03T23:49:59+5:302018-11-03T23:50:14+5:30

जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे.

 Light festival in the dark this time! | प्रकाशाचा सणही यंदा अंधारातच !

प्रकाशाचा सणही यंदा अंधारातच !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे. ही समस्या इतकी गंभीर बनली की, अधिकारी व पुढारीही वैतागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा रबीच्या हंगामाची सुतराम शक्यता नाही. मात्र काही भागात थोडेबहुत पाणी उपलब्ध आहे. धरणे, तलावांचा आधार आहे, अशांनाही पाणी घेण्यासाठी वीजप्रश्न आडवा येत आहे. अनेक ठिकाणी तर गावातच अंधार पसरलेला आहे. दिवाळीचा सण सुरू झाला तरीही रोहित्र दिले जात नाही. त्यामुळे अशा गावांतील लोकांचा आक्रमकपणा महावितरणच्या कार्यालयात पहायला मिळत आहे. शनिवारी प्रतीक्षा यादीत पहिल्या क्रमांकावर असूनही रोहित्र दिले जात नाही. मागील तीन दिवसांपासून चकरा मारूनही अधिकारी दाद देत नाहीत, साधी भेटही देत नाहीत म्हणून कळमनुरी तालुक्यातील जांभरुणचे शेतकरी ओरड करीत होते. यावर झालेला खर्च कोणी भरायचा? असा त्यांचा मुद्दा होता. तरीही त्यांना सोमवारी या असे सांगून सर्वांनीच भेट नाकारली, हे विशेष. मग ही प्रतीक्षा यादी काय नावालाच आहे का? रोहित्रांचे आज काहीच जॉब निघाले नाही का? बाहेरूनच रोहित्र बदलून देण्याचा धंदा अधिकाऱ्यांनी सुरू केला का? अशी बोंब हे शेतकरी ठोकत होते. त्यानंतर गोरेगाव या राजकीय राजधानीतील शेतकरीही बाहेरच जोरात येताना दिसत होते. अधिकारी मात्र त्यांनाही भेट देत नसल्याने त्यांची तगमग पाहण्यासारखी होती. दिवाळीच्या तोंडावरही रोहित्र मिळणार नसेल तर हा काय कारभार चालू आहे, असे या ग्रामस्थांचे म्हणने होते.
याशिवाय शेतीसाठी रोहित्र मागणारे तर महावितरणच्या दारातच ठाण मांडून होते. मात्र गेटपास देण्यासच कोणी तयार नसल्याने अनेकांनी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत वाट पाहून घराचा रस्ता धरला. आता दिवाळी अंधारातच काढावी लागणार असून यंदा शेतीचीही माती होणार असल्याची ओरड हे शेतकरी करताना दिसत होते. एकंदर रोहित्रांचा प्रश्न गंभीर असल्याचेच दिसत आहे.
अशा आहेत याद्या : प्रतीक्षा कायमच
३ नोव्हेंबरच्या प्रतीक्षा यादीत थ्री फेजच्या १00 केव्हीएच्या जळालेल्या रोहित्रांच्या यादीत ८२ गावे आहेत. यापैकी ६0 पूर्ण रक्कम भरलेली आहेत. तर ६३ केव्हीएच्या यादीत ९९ गावे असून पूर्ण रक्कम भरलेली ५९ गावे आहेत. याशिवाय गावठाणच्या ६३ केव्हीएच्या १९ तर १00 केव्हीएच्या १४ डीपी प्रतीक्षा यादीत आहेत. तर २५ केव्हीएच्या जळालेल्या डीपींची संख्या ९७ आहे. त्यामुळे साडेतीनशेच्या आसपास जळालेल्या डीपींची दुरुस्ती दिवाळीपूर्वी शक्य नसून गावठाणातील डीपीही मिळतील की नाही? ही शंका आहे.

Web Title:  Light festival in the dark this time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.