विजेच्या धक्क्याने दोन कुटुंबांचे आधारस्तंभच गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 08:04 PM2020-01-08T20:04:30+5:302020-01-08T20:06:11+5:30
मयत दोघांच्याही कुटुंबियांचा आक्रोश मने हेलावणारा
वसमत : येथे मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचे काम करत असताना लोखंडी शिडी ११ के.व्ही. तारांना लागल्याने दोन जण ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत मयत झालेले दोघेही त्यांच्या कुटुंबाचे मुख्य आधार होते. या घटनेने दोन कुटूंब उघड्यावर आले. घटनास्थळी या कुटुंबियांचा आक्रोश सगळ्यांची मने हेलावून टाकणारा होता.
वसमत येथे नव्याने होत असलेल्या श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या लोखंडी कमानीचे काम सुरू होते. या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केलेले विलास गिरमाजी पतंगे (५४, रा. सोमवारपेठ, वसमत) व सिद्धार्थ केशव वाघमारे (३५, रा.गणेशपूर वसमत) हे दोघे कर्मचारी विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाले. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. अति उच्च दाबाच्या तारांना लोखंडी शिडी स्पर्श झाली आणि क्षणातच त्यांच्या शरीराचा कोळसा झाला. मयतांपैकी विलास पतंगे हे शहरातील अन्य मंगल कार्यालयांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होते. अत्यंत गरीब कुटूंबातील असलेले पतंगे हेच त्यांच्या कुटूंबाचा आधार होते. हे मंगल कार्यालय नव्याने झाल्याने ते तेथे रूजू झाले होते. उत्साहात मंगल कार्यालयाच्या बांधकामापासून त्यांनी काम पाहिले. मात्र मंगल कार्यालयाचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, २ मुली असा परिवार आहे.
या दुर्घटनेत मयत झालेला दुसरा तरूण सिद्धार्थ केशव वाघमारे (३५) हा गणेशपूर येथील रहिवासी आहे. अत्यंत गरीब कुटूंबातील मनमिळावू व्यक्तीमत्व व कष्टाळू तरूण मंगल कार्यालयात कर्मचारी म्हणून नियुक्त झाला. त्याच्या पश्चात पत्नी, ३ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. सिद्धार्थ वाघमारे हाच घराचा आधार होता. आता त्यांचे कुटूंब वाऱ्यावर सापडले आहे. विजेच्या धक्क्याने दोन जीव घेतले. सोबत दोन कुटुंबही उद्ध्वस्त झाले.
घटनास्थळी दोन्ही मयताचे कुटूंबिय दाखल झाले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश सुन्न करणारा होता. प्रत्येकाचे डोळे पाणावणारा हा प्रसंग हृदय हेलावून टाकणारे होते. मयत कुटूंबियांना मदत व्हावी, अशी अपेक्षा प्रत्येकजण व्यक्त करत होता. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सपोनि बळीराम बंदखडके यांनी केला. हे दोन्ही अधिकारी तत्परतेने घटनास्थळी धावले. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
पंधरा दिवसांत दुसरी घटना
कुरूंदा येथेही शिडी तारांना लागून दोन जण ठार झाले होते. पंधरा दिवसांपूर्वीच कुरूंदा येथे नवीन दुकानावर नाव काढण्यासाठी शिडी लावत असताना शिडी तारांना लागली व दोन जण जागीच ठार झाले होते. कुरूंदा व वसमत येथील दोन्ही घटनांत साम्य आहे. दोन्ही जागी शिडी तारांना लागून दुर्घटना झाली. पंधरा दिवसांतीलच या दोन घटनांत वसमत तालुक्यात चौघांचा बळी गेला आहे.