लिगो प्रयोगशाळा शास्त्रज्ञांच्या निवासस्थानांचा प्रस्ताव त्रुटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:36 PM2019-01-12T22:36:03+5:302019-01-12T22:36:53+5:30
लिगो इंडिया प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असले तरीही या प्रकल्पासाठी आवश्यक इतर बाबींचे प्रस्ताव आता वेग घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लिगो इंडिया प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असले तरीही या प्रकल्पासाठी आवश्यक इतर बाबींचे प्रस्ताव आता वेग घेत आहेत. जामवाडी येथील निवासस्थानांसाठी तीन त्रुटी काढल्या असून त्या दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तर दुधाळवाडीच्या रस्त्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे पाठविला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा येथे गुरुत्वीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी उभारण्यात येत असलेल्या या प्रयोगशाळेसाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून तयारी सुरू आहे. आता जमिनीचा प्रश्न सुटला. मात्र या ठिकाणी अभ्यासा साठी येणाºया शास्त्रज्ञांना निवासस्थानांची व्यवस्था करण्यास हिंगोली तालुक्यातील जामवाडी येथील गायरान जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. त्यात शासनाने तीन त्रुटी काढल्या. यात आरआरसी दर, ग्रामपंचायतीचा ठराव व जि.प. सीईओंचे संमतीपत्र आवश्यक आहे. या गावाला त्या तुलनेत गायरान जमीन शिल्लक राहणार की नाही, याची चाचपणी यातून घेतली जात आहे. याशिवाय दुधाळवाडीच्या रस्त्याचा भूसंपादन विभागाकडे सादर केलेला प्रस्ताव त्यांनी वसमतच्या उपविभागीय अधिकाºयांकडे पाठविला आहे. याशिवाय पाणीपुरवठा, महावितरणचे स्वतंत्र प्रस्ताव तयार होणार आहेत. त्या-त्या विभागाकडून अपेक्षित अंदाजपत्रके सादर करून लिगो व्यवस्थापनाशीच थेट बोलणी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही याच पद्धतीने निधी थेट वर्ग करावा लागणार आहे.
या प्रकल्पासाठी आता सर्वच प्रकारची तयारी अंतिम टप्प्यात असल्याने आगामी काही दिवसांत कामाच्या शुभारंभाचा मुहूर्त निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.