अंग झटकून काम होईना; रंगत चढेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:51 PM2019-04-09T23:51:21+5:302019-04-09T23:51:45+5:30
निवडणूक आठ दिवसांवर आली तरी अद्याप निवडणुकीचा प्रचार सुरूच झालेला दिसत नाही. वसमत शहरात तर निवडणुकीचे वारेही नाही. पक्षाचे कार्यकर्ते दूर- दूरच दिसतात. अंग झटकून काम करण्याची तयारी कोणीची नाही. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांच्याच ओळखी नसल्याने दुरावा स्पष्ट दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : निवडणूक आठ दिवसांवर आली तरी अद्याप निवडणुकीचा प्रचार सुरूच झालेला दिसत नाही. वसमत शहरात तर निवडणुकीचे वारेही नाही. पक्षाचे कार्यकर्ते दूर- दूरच दिसतात. अंग झटकून काम करण्याची तयारी कोणीची नाही. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांच्याच ओळखी नसल्याने दुरावा स्पष्ट दिसत आहे.
मतदानाचा दिवस जवळ आला तरी अद्याप वसमत तालुक्यात जवळ रंग भरलेला दिसत नाही. प्रचारात दिसावे लागते म्हणून काही जण दिसतात. एवढेच ‘शक्कर’कशी येणार याची वाट पाहणारेही तटस्थ दिसतात. वसमत शहरात तर कार्यकर्ते अजूनही प्रचारात उतरतांना दिसत नाहीत. दोन्ही प्रमुख उमेदवारांना कार्यकर्त्यांची ओळखीच नाहीत. ऐनवेळी उमेदवारीची बक्षिसी मिळालेल्या उमेदवारांना जो समोर येईल, त्याला आपलेसे करण्याशिवाय मार्ग नाही. उमेदवारासाठी जिवाचे रान करील, अशी यंत्रणा मात्र दिसत नाही. कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी कोणीही काहीच केलेले नाही. त्याचाही राग कार्यकर्त्यांच्या मनात असल्याचे दिसतो.
जे सोबत येत आहेत त्याचा जनाधार किती हासुद्धा प्रश्न आहेच, गावागावातील समीकरणे गट- तट याचीही जाणीव नवख्या उमेदवारांना नाही. त्याचाही फटका प्रचाराला बसतो आहे. कार्यकर्त्यांपर्यंतच उमेदवार अजून पोहोचले नाहीत. तर मतदारांपर्यंत कधी पोहोचणार, हा प्रश्न आहे. मतदार मतदान करतातच त्यांना सांगायची काय गरज, अशी मानसिकता असणारे अनेक पदाधिकारी वसमतमध्ये आहेत. जे फक्त नेते व उमेदवारांच्या सोबत राहण्यात पटाईत असतात. उमेदवारांचा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली शिदोरी घरीच ठेवणारेही अनेकजण आहेत.
एकंदरीत आतापर्यंत तरी उमेदवारांचा कोणताही प्रभाव प्रचारात दिसलेला नाही.
वसमत शहरात तर बोटावर मोजण्याएवढेच काम करताना दिसतात. त्यातीलही अनकजण ‘शक्कर’वर लक्ष ठेवूनच असावेत. दोन्ही प्रमुख पक्षांचे न झेंडे दिसतात न बॅनर. मतदार संपर्क अभियानही दिसत नाही. फक्त पक्षाच्या भरवशावरच ही निवडणूक सुरू असल्याचे विचित्र वातावरण वसमतमध्ये पहावयास मिळते. मतदारांशी संपर्क न साधताही मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडतातच, ज्याला मत द्यायचे त्याला मत देतातच ज्यांच्यावर बुथची जबाबदारी असते त्याने पडलेली मते माझ्यामुळेच पडली, असे सांगण्याचीही वसमतमध्ये जुनी पद्धत आहे. बुथ प्लस राहिले तर माझ्यामुळे राहिले अन् मायनस राहिले तर एखाद्यावर खापर फोडण्याचीही पद्धत आहे. असे बुथ मॅनेजमेंट यावेळीही होते की काही वेगळा अनुभव पहावयास मिळतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.