यंदाही झळकणार करबुडव्यांची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:29 AM2018-02-17T00:29:06+5:302018-02-17T00:29:09+5:30
येथील पालिकेच्या वतीने मागील आठ ते नऊ दिवसांपासून करवसुली मोहिमेसाठी एकूण ११ पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६४८ रुपये करवसुली झाली आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत आता झालेली वसुली काहीच नसल्याने पथक वसुलीसाठी जास्तच जोर देत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील पालिकेच्या वतीने मागील आठ ते नऊ दिवसांपासून करवसुली मोहिमेसाठी एकूण ११ पथकांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६४८ रुपये करवसुली झाली आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत आता झालेली वसुली काहीच नसल्याने पथक वसुलीसाठी जास्तच जोर देत आहे. एवढे करुनही वसुलीसाठी प्रतिसादच न देणाºया करबुडव्यांची यादी मार्चच्या पहिल्या आठवड्यात चौका- चौकात लावून त्यांच्या घरासमोर बॅण्डही वाजविण्याचा इशारा दिला आहे.
पालिकेच्या वतीने करवसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एकूण ११ पथके तयार केली आहेत. यामध्ये घटरपट्टीसाठी ७, नळपट्टीसाठी ३ आणि शासकीय वसुलीसाठी १ पथक तयार केले आहे. त्यामुळे यावर्षी करबुडव्यांची जराही गय केली जाणार नाही. तशा सूचनाच पथकांना दिल्या जात आहेत. एवढेच काय तर कर विहित मुदतीत न भरल्यास पालिकेतर्फे कर वसूल करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून, मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची यादीच वर्तमानपत्रात प्रसिद्ध करुन चौका चौकातही लावली जाणार आहे. शिवाय यंदा करबुडव्यांच्या घरासमोर बॅण्डही वाजविण्याबरोबर नळ जोडणीही तोडली जाणार आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ६४८ रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये घरपट्टी १ लाख ९८ हजार ३५३ तर नळपट्टी ९८ हजार २९५ रुपये झाल्याची माहिती मिळाली आहे. वास्तविक पाहता मागील वर्षी ६ कोटी २० लाख रुपये कर वसुलीची मागणी असताना मार्च एण्डपर्यंत ५ कोटी ३६ लाख रुपये वसूल झाले होेते. तर यंदा ५ कोटी ९९ लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट आहे. सध्या १ कोटी ७५ लाख रुपये वसूल झाले आहेत.
हे करणार पालिका : बॅण्ड, जप्ती, नळ तोडणी
पालिकेतर्फे कर वसुली करण्यासाठी पाहिजे त्या लुप्त्या सुचविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे नळ जोडणीसाठी तीन पथके तयार केले असून, घर पट्टी दिली नसली तरीही नळ जोडणी तोडली जाणार आहे. नळ पट्टी राहिल्यास तर नळ जोडणी तोडणारच त्याच काहीच शंका नाही. आता पर्यंत १० नळ जोडण्या
तोडल्या आहेत. तर काही ग्राहाकांकडून अर्धी- अर्धी वसूली जमा करुन त्यांना १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. तसेच १ मार्च नंतर विविध प्रभागात तंबू टाकून यंदाही वसूली केली जाणार असल्याचे पथक प्रमुख पंडित मस्के यांनी सांगितले.
वसुलीसाठी पथके विविध भागात फिरत आहेत. त्याच बरोबर लाऊड्स्पीकरद्वारेही वसुलीचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे कर भरुन पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन सीओ रामदास पाटील यांनी केले.