राहतात हिंगोलीत; लायसन्स काढले परदेशाचे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:57+5:302021-07-09T04:19:57+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील दहा नागरिक वेगवेगळ्या कारणांकरिता परदेशात गेले आहेत. परदेशात राहून ड्रायव्हिंग करता यावे, यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग ...
हिंगोली : जिल्ह्यातील दहा नागरिक वेगवेगळ्या कारणांकरिता परदेशात गेले आहेत. परदेशात राहून ड्रायव्हिंग करता यावे, यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमीट (आयडीपी) काढल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यातून २०११ मध्ये १, सन २०१३ मध्ये १, सन २०१५ मध्ये १, सन २०१६ मध्ये १, सन २०१७ मध्ये २, सन २०१८ मध्ये १, सन २०१९ मध्ये १, तर २०२१ मध्ये दोन जणांनी परदेशात राहून ड्रायव्हिंग करता यावी यासाठी लायसन्स काढले आहेत. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिटची मुदत एक वर्षाची ठेवण्यात आलेली आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईनही करता येते. परंतु, परदेशात ड्रायव्हिंग करायचे झाल्यास लायसन्ससाठी लागणारी सर्व कागदपत्रे उप प्रादेशिक कार्यालयात दाखविणे गरजेचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पासपोर्ट, आधारकार्ड, ज्या देशाचा व्हिसा आहे तो सोबत आणणे आवश्यक आहे. तेव्हाच परदेशात ड्रायव्हिंग करण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या वतीने लायसन्स दिले जाते.
मुदत एक वर्षाचीच
परदेशात राहून ड्रायव्हिंग करायची असल्यास त्याची मुदत एक वर्षाचीच राहणार आहे. नव्याने लायसन्स काढण्यासाठी त्याचे नूतनीकरण करून घेण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालयात येऊन सर्व कागदपत्रे नव्याने द्यावी लागणार आहेत.
तुम्हालाही काढायचे इंटरनॅशनल लायसन्स?
ज्यांना परदेशात जाऊन तेथे ड्रायव्हिंग करायची असल्यास त्यांनी परदेशात जाण्याअगोदर उपप्रादेशिक कार्यालयात येऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी व्हिसा, आधारकार्ड, पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे उप प्रादेशिक कार्यालयात द्यावी. तेव्हा कागदपत्रांची पडताळणी करूनच एक वर्षाचे लायसन्स दिले जाते.
प्रतिक्रिया
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) हे ऑनलाईन काढता येते; पण कागदपत्रांसाठी उप प्रादेशिक कार्यालयात जाणे गरजेचे आहे. लायसन्ससाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर परदेशात ड्रायव्हिंग करण्यासाठीचे लायन्स संबंधितांना सुपूर्द केले जाते.
- अनंता जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी