राखीव वनात गुरे चारल्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:53 AM2019-09-10T00:53:39+5:302019-09-10T00:54:00+5:30
वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दुघाळा शिवारातील राखीव वनक्षेत्रात वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी गुरे चारल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या दुघाळा शिवारातील राखीव वनक्षेत्रात वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी गुरे चारल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वन कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल केला. ही घटना रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास घडली असून यामध्ये गुराख्यांनी वन अधिकाºयास हाणामारी झाल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
औंढा नागनाथ दुघाळा वनक्षेत्र अंतर्गत रविवारी सायंकाळच्या सुमारास ज्या ठिकाणी वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत रोपवनात काशीतांडा येथील दादाराव जाधव, अनिल जाधव हे दोघे गुरे चारून लागवड केलेल्या वृक्षांची नासधूस करीत असल्याची माहिती वनपाल टी.एम. सय्यद यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली तरी देखील दोघा गुराख्यांनी गुरे बाहेर न काढता वन कर्मचाºयास दगडफेक करून मारहाण केली. याबाबत सय्यद यांनी कार्यक्षेत्राचे वनरक्षक वनपाल जयश्री बर्गे, वनरक्षक पोले यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अनिल जाधव हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तर दादाराव जाधव यांना दोन बैलांसहित ताब्यात घेण्यात आले. वन कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. त्याला सोमवारी वनविभागाने न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. तर संबंधित आरोपींनी शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला तसेच मारहाण केल्याप्रकरणी ३५३ आयपीसी अंतर्गत पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी गुन्हा नोंदविला आहे.