पशुधनाची खरेदी-विक्री बंद ; बळीराजासमोर पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:57+5:302021-05-23T04:28:57+5:30
सध्या शेतकरी पेरणीसाठी खते, बियाणेसह पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करीत आहेत. बैलजोडी असली तरी वेळेची बचत व्हावी, यासाठी ...
सध्या शेतकरी पेरणीसाठी खते, बियाणेसह पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची खरेदी करीत आहेत. बैलजोडी असली तरी वेळेची बचत व्हावी, यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या सहायाने मशागत करण्याला पसंती देत होते. परंतु, डिझेल भाव वाढीमुळे ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढविण्यात आले आहेत. अल्प भूधारक शेतकऱ्यांना हे दर परवडणारे नसल्याने हे शेतकरी बैलजोडीच्या सहायाने मशागत करण्यावर भर देत आहेत. मात्र सध्या जनावरांचे बाजार कोरोनामुळे बंद असल्याने बैलजोडी कुठून खरेदी करायची याची चिंता लागली आहे. यासाठी शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी ५० हजारांना विक्री केलेली बैलजोडी आता १ लाखापर्यंत खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले
जिल्ह्यात डिझेलच्या दराने नव्वदी ओलांडली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. गतवर्षीपेक्षा २०० ते ३०० रूपयांनी वाढ केली असून सध्या नांगरणीसाठी प्रती एकरी १७०० ते १८०० रूपये घेतले जात आहेत. तसेच रोटावेटर ११०० ते १२००, पंजी ११०० ते १२००, फणकटी ८०० ते ९०० रूपये, पेरणीचे दर प्रती एकरी ८०० ते १०० रूपये प्रमाणे झाले आहेत.