लॉकडाऊनचा फटका : सरपंचाने काम हिरावले, कंत्राटदाराने वाऱ्यावर सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 03:45 PM2020-05-20T15:45:12+5:302020-05-20T15:48:36+5:30

कामानिमित्त घर सोडून परराज्यात आल्याने (बेघर झाल्याने) राहावे तरी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 

Lockdown blow: loses work due to Sarpanch's pressure, contractor leaves in the Hingoli | लॉकडाऊनचा फटका : सरपंचाने काम हिरावले, कंत्राटदाराने वाऱ्यावर सोडले

लॉकडाऊनचा फटका : सरपंचाने काम हिरावले, कंत्राटदाराने वाऱ्यावर सोडले

Next
ठळक मुद्दे हिंगोली जिल्ह्यात मजूर कुटुंबातील २२ जणांचे हाल गावी नेऊन सोडा- मजुरांची आर्त हाक

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील पुलाच्या कामावरून गावच्या सरपंचाने बाहेरच्या मजुरांना विरोध केला. गावाकडे सोडतो म्हणून कंत्राटदाराच्या माणसांनी हिंगोलीत आणले. मात्र, अजून व्यवस्था न झाल्याने टाळेबंदीच्या कचाट्यात सापडलेले २२ मजूर लहान-मुलाबाळांसह हिंगोली शहरातील चिरागशहा दर्गाह परिसरात थांबले आहेत. आता आम्ही जावे तरी कुठे? असा प्रश्न ते विचारत आहेत.

पोटाची खळगी भरण्यासाठी राज्य, परराज्यातून हिंगोली जिल्ह्यात कामानिमित्त अडकलेल्या मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाऊमुळे घरी जाता येईना अन् आपले दु:खही कोणाला सांगता येईना, अशी परिस्थिती त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. कामानिमित्त घर सोडून परराज्यात आल्याने (बेघर झाल्याने) राहावे तरी कुठे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 
मध्यप्रदेशातील रतलाम येथील बसंतीलाल माळी हे फेब्रुवारी २०२० या महिन्यात कुटुंबासह सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे सुरू असलेल्या रस्ता पुलाच्या बांधकामासाठी आले होते. त्यांच्यासोबत इतर चार ते पाच कुटुंबातील मंडळीही आहे. लहान मुलाबाळांसह मिळून जवळपास २२ जण आहेत. परंतु कोरोना विषाणूमुळे सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका त्यांना बसला आहे. गावातील सरपंचांनी स्थानिकांना काम द्या म्हणून या मजुरांना विरोध केल्याचे बसंतीलाल माळी सांगत आहेत. 

तर संबंधित कंत्राटदाराकडील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला तुमच्या गावी नेऊन सोडतो असे सांगून त्यांना १६ मे रोजी हिंगोलीत आणले. त्यानंतर या सर्व मजुरांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य तपासणी करून घेतली.  त्यामुळे आता आपल्याला गावी परतता येईल या आशेने हे सर्व मजूर कंत्राटदाराची वाट पाहात आहेत. वाहनाची व्यवस्था करतो असे म्हणून निघून गेलेला कंत्राटदार मात्र आतापर्यंत आमच्याकडे फिरकलाच नाही, असे बसंतीलाल यांनी सांगितले. 

गावी नेऊन सोडा- मजुरांची आर्त हाक
जिल्हा प्रशासनाने आम्हाला आमच्या गावी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनवणी हे मजूर करीत आहेत. हे सर्वजण कोरोनाच्या भीतीने सध्या चिरागशहा दर्गा परिसरातच वास्तव्यास आहेत. सोबत काही रेशन आहे. त्यावर सध्या ते गुजराण करीत आहेत. परंतु आता रेशनही संपत आले आहे, त्यामुळे प्रशासनाने आम्हा मजुरांची दखल घ्यावी, आमच्या गावी नेऊन सोडावे, अशी आर्त हाक हे मजूर देत आहेत. 
 

Web Title: Lockdown blow: loses work due to Sarpanch's pressure, contractor leaves in the Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.