Lockdown In Hingoli : विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 04:21 PM2020-08-07T16:21:42+5:302020-08-07T16:28:41+5:30
ग्रामीण भागातील काही भाजीपाला विक्रेत्यांना संचारबंदी लागू असल्याची माहिती नव्हती
हिंगोली : जिल्ह्यात संचारबंदी लागू असली तरी काहीजणांना गांभीर्य नाही. ७ ऑगस्ट रोजी शहरात सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर तसेच भाजीपाला विक्रेत्यांवर नगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली. तर काहींना समज देऊन यापुढे संचारबंदीत विनाकारण बाहेर येऊ नये ताकीद देण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑगस्टपासून संचाबंदी लागू केली आहे. परंतु शहरातील गांधी चौक तसेच जवाहर रोड व भाजीमंडी परिसरात सकाळी ८ ते १० या वेळेत भाजीपाला व दुध विक्रेते गर्दी करीत आहेत. दुध विक्रेत्यांनी घरपोच तेही सामाजिक अंतर ठेवून दूध विक्री करण्यास मुभा आहे. परंतु काही दुध विक्रेते शहरातील गांधी चौक तसेच सराफा बाजारात गर्दी करून थांबत असल्याचे नगरपालिकेच्या पथकाला आढळुन आले.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील काही भाजीपाला विक्रेत्यांना संचारबंदी लागू असल्याची माहिती नव्हती, त्यामुळे शुक्रवारी त्यांना सोडून देण्यात आले. परंतु, यापुढे जर विक्रेते आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये, कायदा हातात घेतल्यास कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.