Lockdown : हिंगोली जिल्ह्यात ६ ते १९ ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 06:55 PM2020-08-03T18:55:09+5:302020-08-03T18:59:33+5:30
या कालावधीत किराणा दुकानासह सर्व खासगी आस्थापना बंद असणार आहेत.
हिंगोली : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ६ ऑगस्ट ते १९ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत किराणा दुकानासह सर्व खासगी आस्थापना बंद असणार आहेत. या लॉकडाऊनची अत्यंत कठोर व कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकारांशी बोलतांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, हिंगोली शहर व जिल्ह्यात शासकीय विलगीकरण कक्षामध्ये जास्तीत-जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन केला जात आहे. व्यवस्थेत काही उणिवा असतील तर त्या पुढे आल्यास त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांची होणार अॅन्टीजन तपासणी
या दरम्यान शासकीय कार्यालये, बँका वगळता सर्व खासगी आस्थापने बंद राहणार आहेत. यासह किराणा दुकान, ईतर सर्व छोटी-मोठी दुकाने, व्यवसाय देखील बंद राहणार आहेत. दरम्यान, या काळात सर्व किराणा दुकानदार व व्यापारी यांची अॅन्टीजन तपासणी केली जाणार आहे. तपासणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांना लॉकडाऊननंतर आस्थापने उघडता येणार नाहीत.