कुरूंदा येथे धाडसी चोरीत १ लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:26 PM2019-07-01T18:26:16+5:302019-07-01T18:28:34+5:30
धाडसी चोरीमुळे गावात खळबळ
कुरूंदा (हिंगोली ) : येथे कानोडी गल्लीतील नरोबा गोलेवार यांच्या घरातून रविवारी रात्रीला अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे गंठण, कानातील झुंबर, गळ्यातील सोन्याचे लॉकेट असा एकूण १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. धाडसी चोरीमुळे गावात खळबळ उडाली असून यापूर्वीही कुरूंद्यात चोरीच्या घटना घडल्या आहे. चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील फिर्यादी नरोबा विश्वनाथ गोलेवार यांच्या घरात चोरट्यांनी बाजूच्या घराच्या पत्रावरून प्रवेश करून टॉवरच्या पायरीने घरात शिरले व दरवाजा नसलेल्या खोलीच्या कपाटातील लॉकरमधून ९० हजाराची तीन तोळ्याची गंठण, १५ हजार रुपये किंमतीचे कानातील एक जोड झुंबर, ४ हजार रुपयांची दोन ओम लॉकीट असे एकूण १ लाख ९ हजार सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. घटनास्थळी सपोनि सदानंद येरेकर, फौजदार नेंटके, सहा.पोउपनि शंकर इंगोले यांनी भेट देवून पाहणी केली. फिर्यादी नरोबा गोेलेवार यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरडशहापूर येथे फिर्यादी ग्रामसेवक रामराव चौधरी यांनी शनिवारच्या आठवडी बाजारात रोडलगत मोटारसायकल क्र. एम.एच.३८ एच ४६९२ अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. या प्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीच्या घटनामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चोरीच्या घटनांचा तपास लागलेला नसताना उलट त्यात भर पडत आहे. कुरूंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात कुरूंदा पोलीसांना अपयश आल्याचे चित्र आहे.