हिंगोलीत शासकीय कर्मचाऱ्यांकडून ड्रेसकोडला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:29+5:302021-01-09T04:24:29+5:30
हिंगोली : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेवर येवून जनमानसातील प्रतिमा मलीन न होता ड्रेसकोड घालून कार्यालयात यावे, असे राज्य ...
हिंगोली : अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळेवर येवून जनमानसातील प्रतिमा मलीन न होता ड्रेसकोड घालून कार्यालयात यावे, असे राज्य शासनाचे परिपत्रक असतानाही शुक्रवारी खादी तर सोडा सूचनेनुसार ड्रेसकोडही बहुतांश कर्मचाऱ्यांनी घातलेला नव्हता. काहींनी जीन्स पँट व टी शर्ट घातल्याचे दिसून आले.
८ डिसेंबर रोजी प्रधान सचिवांच्या स्वाक्षरीने राज्यातील सर्व कार्यालयांना ड्रेसकोडबाबत सूचनाही देण्यात आलेली आहे. परंतु, हिंगोलीतील शासकीय कार्यालयात ड्रेसकोडचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. शहरातील पंचायत समिती, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा परिषद, नगर परिषद आदी कार्यालयांत ड्रेसकोडला ‘खो’ दिल्याचे पहायला मिळाले. पं. स. कार्यालयात निवडणुकीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांनी रंगबेरंगी कपडे परिधान केलेले दिसले. विशेष म्हणजे, प्रधान सचिवांंनी दिलेल्या सूचनांचे पालन मात्र सेवकवर्गाने केल्याचे आढळून आले.
खुर्च्याही खाली...
शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस सुटीचे पाहून अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे टाळलेले पहायला मिळाले. जि. प. मधील अधिकारी वगळता बहुतांश कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोड परिधान केलेला आढळून आला नाही. काहींनी तर रंगबेरंगी टी शर्टही घातले होते.
ड्रेसकोडची सूचना परिपत्रक आल्यानंतर दिलेली आहे. शुक्रवार हा खादीचे कपडे वापरण्याचा दिवस असून त्याबाबतही कर्मचाऱ्यांना तशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. ड्रेसकोडबाबत कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
-धनवंतकुमार माळी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी
शासनाचे परिपत्रक गावीच नाही
प्रधान सचिवांच्या स्वाक्षरीने काढलेले परिपत्रक सर्व शासकीय कार्यालयांत पोहोचले आहे. परंतु, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना याची माहितीही नाही. नगरपरिषदेच्या सर्वच विभागांत कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोडला फाटा दिल्याचे शुक्रवारी पहायला मिळाले.
शासनाच्या सूचनेनुसार सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडबाबत कळविले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. परंतु, कोणी ड्रेसकोड घालत नसेल तर त्यांना सुरुवातीला तोंडी कळविले जाईल आणि नंतर नोटीस दिली जाईल.
-डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, न. प.
ड्रेसकोडचा फज्जा...
पाच दिवस कार्यालयात काम करताना ड्रेसकोड आवश्यक असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोड वापरलेला आढळून आला नाही. या कार्यालयातील अधिकारी दौऱ्यावर गेले होते. दोन कर्मचारी हजर होते अन् तेही ड्रेसकोडविना.
शासनाचे ड्रेसकोडबाबत परिपत्रक आलेले असून सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे. तशा सूचनाही कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. दोन दिवसांत म्हणजे सोमवारपासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार असून ड्रेसकोड बंधनकारक केला जाईल.
के. जी. राऊत, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक