महालक्ष्मी सणाचा बाजार फुलला; भाज्या मात्र कडाडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:49+5:302021-09-13T04:27:49+5:30
हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० ...
हिंगोली: बाप्पांच्या आगमनापूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे महालक्ष्मी सणाचा बाजार शहरात फुलला होता. ४० रुपये किलो मिळणाऱ्या गवार शेंगा ८० रुपये किलो दराने विकल्या गेल्या. महालक्ष्मी सणाच्या दिवशीच भाज्यांचे भाव कडाडल्यामुळे ग्राहक विक्रेत्यांशी घासघीस करताना दिसून आले.
कोरोना महामारीमुळे दीड वर्ष महालक्ष्मी सणाचा बाजार भरला गेला नाही. परंतु, या वेळेस जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रविवारी ज्येष्ठागौरीला आवाहन असल्यामुळे बाजारात महिलांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली. गतवर्षी महालक्ष्मींच्या मुखवट्यांचा दर ५०० रुपये होता. परंतु, या वेळेस तो वाढला गेला असून ८०० रुपयाला मुखवट्यांची जोडी असा भाव राहिला. गतवर्षी कोथळ्यांचे भाव ७०० रुपये होते. या वेळेस ८०० ते ८५० रुपयांवर कोथळ्यांचे भाव पोहोचले होते. शहरातील गांधी चौक, महावीर चौक या गजबजलेल्या ठिकाणी जवळपास १५ विक्रेत्यांनी मुखवटे व सजावटींच्या साहित्यांची दुकाने थाटली होती.
फुलांचे हारही महागले...
सद्य:स्थितीत शहरात फुलांची आवक बऱ्यापैकी असली तरी महालक्ष्मी सण लक्षात घेऊन सुट्या फुलांबरोबर फुलांचे हारही महागले होते. २० रुपयाला मिळणारा साधा फुलांचा हार ५० ते ६० रुपयाला विकला गेला. .... रुपयांपासून .... रुपयांपर्यंत फुलांचे दर असल्याचे फूल विक्रेत्यांनी सांगितले.
टोमॅटो मात्र १० रुपये किलो...
महालक्ष्मी सणाच्या तोंडावर इतर भाज्या महागल्या असल्या तरी टोमॅटो मात्र १० रुपये किलो प्रमाणे विकल्या गेले. यामुळे ग्राहकांचा ओढा टोमॅटोकडे जास्त असल्याचे भाजी मंडईत पाहायला मिळाले.
भाज्या कडाडल्या...
गवार शेंग ८० रुपये किलो
वांगे ६० रुपये किलो
चवळी ६० रुपये किलो
दोडके ४० रुपये किलो
वॉलाच्या शेंगा ४० रुपये किलो
फुलकोबी ४० रुपये किलो
कारले ४० रुपये किलो
बीटरुट ४० रुपये किलो
भेंडी ३० रुपये किलो
ढोबळ मिरची ३० रुपये किलो
पानकोबी २० रुपये किलो
पालक २० रुपये जुडी
भाजी व्यवसाय करणे झाले कठीण...
भाज्यांचे उत्पादन चांगले होत असले तरी पावसामुळे भाज्या मंडईत आणणे शक्य होत नाही. अर्ध्याअधिक भाज्या काढणी करतेवेळेस खराब होत आहेत. सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सणासुदीला भाजीपाल्याचे दर वाढल्याची प्रतिक्रिया पंढरी थोरात व विशाल सातव यांनी दिली.
प्रतिक्रिया...
महालक्ष्मी सणाला भाज्या स्वस्त होतील, असे वाटले होते. परंंतु महालक्ष्मी आवाहनालाच भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. यामुळे एकच भाजी महालक्ष्मी सणाला घ्यावी लागली.
-सुरेखा कल्याणकर, गृहिणी
सणासुदीचे दिवस असल्यामुळे भाजी मंडईत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे गल्लीत आलेल्या हातगाड्यांवर भाजी घ्यावी म्हटले तर छोटे विक्रेते अव्वाच्या सव्वा भाज्यांचे भाव सांगतात. त्यामुळे सणालाही भाज्याविनाच स्वयंपाक करावा लागतो.
-शिल्पा रोकडे, गृहिणी
-