महालक्ष्मी, गणेशोत्सवात फुलांचे भाव भिडले गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:49+5:302021-09-14T04:34:49+5:30
हिंगोली : परराज्यांतून येणाऱ्या फुलांची आवक श्री महालक्ष्मी आणि गणेशोत्सवात कमी झाल्यामुळे फुलांचे भाव ऐन सणामध्ये गगनाला भिडले आहेत. ...
हिंगोली : परराज्यांतून येणाऱ्या फुलांची आवक श्री महालक्ष्मी आणि गणेशोत्सवात कमी झाल्यामुळे फुलांचे भाव ऐन सणामध्ये गगनाला भिडले आहेत. दिल्ली येथून येणारी शेवंतीची फुले ४०० रुपये किलोप्रमाणे सोमवारी फूल बाजारात विक्री झाली.
१० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला ‘श्रीं’ ची उत्साहात स्थापना करण्यात आली. १२ सप्टेंबर रोजी श्री महालक्ष्मीला आवाहन करीत घरोघरी विधिवतपणे स्थापना करण्यात आली. सोमवारी श्री महालक्ष्मीचे घरोघरी उत्साहात पूजनही करण्यात आले. या दोन्ही सणांच्या काळात पूजनासाठी फुले व हार भरपूर प्रमाणात मिळतील, असे वाटले होते. परंतु सोमवारी फुलांचे भाव गगनाला भिडल्याचे पाहून भाविकांनी थोडी थोडकीच फुले नेऊन श्री महालक्ष्मी व श्री गणरायाचे पूजन केले.
शहरात हैदराबाद, दिल्ली, पुणे, नगर, औरंगाबाद, जालना, अहमदनगर आदी मोठ्या शहरांतून फुलांची आवक होते. परंतु, ऐन सणाच्या काळातच फुलांची आवक कमी झाली आहे.
असे राहिले फुलांचे भाव....
पांढरी शेवंती ४०० रुपये किलो
गुलाब ३०० रुपये किलो
पिवळी शेवंती ३०० रुपये किलो
मेरीगोल्ड शेवंती २०० रुपये किलो
झेंडू २० रुपये किलो
कारागिरांचा खर्चही निघेना...
महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे फूल व्यावसायही सद्यस्थितीत डबघाईला आला आहे. शहरात आजमितीस १० दुकाने असली तरी प्रत्येक दुकानामध्ये दोन-दोन कारागिर आहेत. त्यातच फुलांची आवक कमी झाल्यामुळे कारागिरांचा पगार काढणेही मुश्कील होऊन बसले आहे. नेहमी सणासुदीला फुलांची आवक जास्त असते. त्यावेळेस हारांचा भाव १५० रुपयांपर्यंत राहिला. परंतु, यावेळेस फुलांची आवक कमी झाल्यामुळे फुलांचा हार सणासुदीला २०० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत विकला जात आहे.
-युनूस सय्यद तांबोळी, फूल विक्रेता