कोरोना महामारीमुळे महामंडळाची ‘शिवशाही’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:53+5:302021-04-19T04:26:53+5:30
हिंगोली: गत दीड वर्षाापासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार केला आहे. त्यामुळे ‘शिवशाही’ बस चालविणे कठीण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ...
हिंगोली: गत दीड वर्षाापासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार केला आहे. त्यामुळे ‘शिवशाही’ बस चालविणे कठीण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनानेच फेब्रुवारी २०२१ पासून ‘शिवशाही’ बस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एस. टी. महामंडळाच्या हिंगोली आगारात ५ ‘शिवशाही’ बसेस कार्यरत आहेत. परंतु, २३ मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट सर्वत्र घोंगावत आहे. कोरोना महामारीच्या आधी ‘शिवशाही’ बसचे उत्पन्न दिवसांकाठी रोज ५५ ते ६० हजारांच्या घरात होते. परंतु, कोरोनामुळे यात खूप घट झाली असून, २० हजार रुपयेही पदरात पडेनासे झाले.
हिंगोली आगारातून सकाळी आणि सायंकाळी हिंगोली - पुणे ‘शिवशाही’ बसला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. परंतु, कोरोनाची दृष्ट लागल्याने शासनाला अखेर ही बस बंद करावी लागली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे उत्पन्न तर सोडा साधा डिझेलचा खर्च निघेनासा झाला आहे.
महामंडळास एवढी ‘शिवशाही’ बस चालविणे कठीण झाले होते. अखेर शासनाने याचा विचार करून कोरोना संपेपर्यंत शिवशाही बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळेस कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर होईल तेव्हाच ‘शिवशाही’ बस सुरू केली जाईल, अशी सूचनाही शासनाने महामंडळाला दिली आहे.
कोरोना आधी आरक्षण व्हायचे...
कोरोना आधी ‘शिवशाही’मार्फत एस. टी. महामंडळास चांगले उत्पन्न मिळायचे. परंतु, आजमितीस अशी परिस्थिती आहे की, उत्पन्न तर सोडा प्रवासीही मिळेना झाले आहेत. आरक्षण तर मार्च २०२० पासून बंदच आहे. या अगोदर ‘शिवशाही’साठी आरक्षण होत असे. आरक्षणातून एस. टी. महामंडळाला चांगला नफाही व्हायचा. कोरोनामुळे होत्याचे नव्हते असेच झाले आहे. ‘शिवशाही’तून महिनाकाठी एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे.
लांब पल्ल्याच्या बसेसही बंदच
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे लांब पल्ल्याच्या बसेसही बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बसेस बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा तसा आदेश आहे. हैदराबाद, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या बसेस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे बंदच ठेवण्यात आलेल्या आहेत. शासनाचे जसे आदेश येतील, त्या प्रमाणे महामंडळ बसेस सुरू करेल. आजमितीस तरी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन एस. टी. महामंडळ काटेकोरपणे करीत आहे.
-संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली