हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 04:05 PM2024-11-15T16:05:37+5:302024-11-15T16:22:26+5:30
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.
Maharashta Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडूनही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगांच्या तपासणीवर राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या तपासणीचे व्हिडीओ काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही बॅगांची तपासणी व्हायला हवी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता हिंगोलीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली आहे. यावेळी भाजप सर्व नियमांचे पालन करत असल्याचेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.
गेल्या चार दिवसांत विविध ठिकाणी निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता हिंगोली येथे गृहमंत्री अमित शाह यांची बॅग तपासण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शाह यांची बॅग तपासली. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात आणि मंगळवारी लातूरमध्ये ,तर बुधवारी कोकण दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली होती.
"आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि माननीय निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो. आपण सर्वांनी निष्पक्ष निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिले पाहिजे आणि भारताला जगातील सर्वात मजबूत लोकशाही कायम ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे," असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
आज महाराष्ट्र की हिंगोली विधानसभा में चुनाव प्रचार के दौरान चुनाव आयोग के अधिकारियों के द्वारा मेरे हेलिकॉप्टर की जाँच की गई।
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2024
भाजपा निष्पक्ष चुनाव और स्वस्थ चुनाव प्रणाली में विश्वास रखती है और माननीय चुनाव आयोग द्वारा बनाए गए सभी नियमों का पालन करती है।
एक स्वस्थ चुनाव… pic.twitter.com/70gjuH2ZfT
दरम्यान, याआधी भाजप महाराष्ट्रने बुधवारी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये निवडणूक अधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासत होते. यावेळी केवळ दिखाव्यासाठी संविधानाचा आधार घेणे पुरेसे नाही आणि प्रत्येकाने घटनात्मक व्यवस्थेचेही पालन केले पाहिजे, काही नेत्यांना नाटक करण्याची सवय आहे, असे भाजपने या पोस्टमध्ये म्हटले होते.