हिंगोलीत काँग्रेस, वंचितचे उमेदवार प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 07:09 PM2019-10-02T19:09:41+5:302019-10-02T19:11:55+5:30
भाजपकरांना होणारा आनंद अल्पजीवी ठरला.
- विजय पाटील
हिंगोली : वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांची उमेदवारी जाहीर होण्यास लागलेल्या विलंबामुळे भाजपकरांना होणारा आनंद अल्पजीवी ठरला.
मंगळवारी मुंदडा यांची उमेदवारी जाहीर झाली अन् भाजपच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे हिंगोलीत अपेक्षेप्रमाणेच भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे यांचीही उमेदवारी जाहीर झाली.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या मतदारसंघातच दोन्ही प्रमुख पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. काँग्रेसकडून आ. संतोष टारफे तर सेनेकडून संतोष बांगर लढत देणार आहेत. या मतदारसंघातील अनेक जण वंचितच्या उमेदवारीवर डोळा ठेवून आहेत. मात्र कोण बाजी मारते, हे कळायला मार्ग नाही. काहींनी अपक्ष म्हणूनही तयारी चालविली आहे. त्यातच युतीची अधिकृत घोषणा झाल्याने भाजपचे माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे यांची भूमिका काय राहील, याकडे लक्ष लागले आहे. हे दोन्ही दिग्गज मैदानाबाहेरच राहणार की एकमेकांना साथ देत कुणाला रिंगणात उतरविणार, याचीही चर्चा जोर धरत आहे.
वसमतमध्ये मंगळवारी शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांची उमेदवारी जाहीर झाली. काल वंचिततर्फे माजी सभापती मुनीर पटेल यांची उमेदवारी जाहीर झाली होती. आता येथे भाजपचे शिवाजी जाधव बंडखोरी करणार हे निश्चित झाले आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवारच अजून निश्चित नाही. हिंगोली मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे आ.तान्हाजी मुटकुळे यांची उमेदवारी जाहीर झाली ंअसून काँग्रेसकडून भाऊराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येथे वंचितच्या उमेदवाराचा अजूनही पत्ता नाही.