प्रतिष्ठा अन् अस्तित्वासाठी लढाई... महायुतीच्या किल्ल्यात आघाडीचे आव्हान !
By प्रसाद आर्वीकर | Published: November 1, 2024 09:30 AM2024-11-01T09:30:56+5:302024-11-01T09:39:14+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीने तिन्ही विद्यमान आमदारांना निवडणूक रिंगणात उतरिवले आहे. त्यांच्या विरोधात आघाडीतील उद्धवसेनेने हिंगोली व कळमनुरीमध्ये उमेदवार दिले आहेत, तर शरद पवार गटाने वसमतमध्ये अजित पवार गटाच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे.
हिंगोली : तिन्ही मतदारसंघावर वर्चस्व असणाऱ्या महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली असून, तुल्यबळ उमेदवार देऊन महाविकास आघाडीनेमहायुतीसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे हिंगोलीतील विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठा अन् अस्तित्वाची निवडणूक ठरत आहे.
या जिल्ह्यातील तिन्ही जागांवर महायुतीचे वर्चस्व आहे. महायुतीने तिन्ही विद्यमान आमदारांना निवडणूक रिंगणात उतरिवले आहे. त्यांच्या विरोधात आघाडीतील उद्धवसेनेने हिंगोली व कळमनुरीमध्ये उमेदवार दिले आहेत, तर शरद पवार गटाने वसमतमध्ये अजित पवार गटाच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
जिल्ह्याची निर्मिती होऊन २९ वर्षांचा कालखंड उलटला पण, एकही मोठा उद्योग येथे आला नाही.
उद्योग, व्यवसाय नसल्याने युवकांना नोकरीसाठी स्थलांतर करावे लागते. स्थानिक पातळीवर नोकऱ्या मिळत नाहीत.
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई अद्यापही मिळाली नाही.
शेतमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असताना त्याबाबत कोणीही ब्र शब्द काढत नाही.
शिक्षण, आरोग्याच्या सुविधांचा वाणवा. शिक्षणासाठी बाहेर जिल्ह्याचा रस्ता धरावा लागतो.
जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे
विधानसभा मतदारसंघ मतदान विद्यमान आमदार पक्ष मिळालेली मते
कळमनुरी ६९% संतोष बांगर शिवसेना ८२५१५
हिंगोली ६४% तान्हाजी मुटकुळे भाजप ९३३१८
वसमत ७४% चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस ७५३२१