Maharashtra Bandh : हिंगोली जिल्ह्यात कडककडीत बंद; बाळापुरात आंदोलकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:40 PM2018-08-09T12:40:25+5:302018-08-09T12:43:59+5:30
जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
हिंगोली : जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच रस्ते निर्जन होते. वाहनांचा तर पत्ताच नव्हता.
हिंगोली येथील आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. रस्त्यावरही वाहनांचा पत्ता नव्हता. गांधी चौकात आज पुन्हा मुंडन आंदोलन करण्यात आले. यामध्ये पन्नास ते साठ जणांनी शासनाच्या निषेधार्थ मुंडन केले. यावेळी सरकारविरोधी घोषणा मोठ्या प्रमाणात दिल्या जात होत्या. तालुक्यात कनेरगाव नाका येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. अकोला बायपासवर टायर जाळून आंदोलकांनी रस्ता बंद केला होता.
वसमत तालुक्यात रेल्वे रोको
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रेल्वे रोको आंदोलन केले. अकोला-पूर्णा पॅसेंजर अडविण्यात आली. त्याचबरोबर कौठा येथे सात वाजता नांदेड-जिंतूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. वसमत शहरातही कडकडीत बंद होता. व्यापा-यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. कुरुंदा, गिरगाव, हट्टा, हयातनगर, आंबा आदी मोठ्या गावांतही बंदला प्रतिसाद मिळाला.
प्रवाशांना खिचडी वाटप
वसमत तालुक्यातील कौठा येथील आसना नदीच्या पुलावर प्रवासात अडकलेल्यांना आंदोलकांनी खिचडीचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
सेनगावात स्कूल बस जाळली
सेनगव येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनास हिंसक वळण मिळाले. आंदोलकांनी स्कूल बस जाळल्याची घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. कडोळी येथे बसस्थानकावर टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला. तर गारखेडा येथील युवकांनी कडोळी-भगवती रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला. सवना येथेही कडकडीत बंद पाळून रास्ता रोको केला. तर आंदोलकांनी रस्त्यावरच स्वयंपाक केला.
कळमनुरीतही बंद, नांदापूर रस्त्यावर खिचडी शिजली
कळमनुरी येथे रास्ता रोको करून बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर तालुक्यातील नांदापूर येथील टी पॉर्इंटवर रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून रस्त्यावर खिचडी शिजविण्यात आली. जवळपास दोन हजार आंदोलक रस्त्यावर उतरले होते. डोंगरकडा, हिवरा येथेही कडकडकीत बंद होता. डोंगरकड्यात राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मारला होता. जवळा पांचाळ येथेही गाव बंद केले.
बाळापुरात रक्तदान
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जमलेल्या आंदोलकांनी रस्त्यावर रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम घेतला. त्याला प्रतिसादही मिळत होता. अगदी सुरुवातीलाच दहा ते पंधरा जणांनी रक्तदान केले. आंदोलकांनी रास्ता रोकोही केला.
औंढ्यातही बंद, रास्ता रोको
औंढा नागनाथ येथेही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. याशिवाय जिंतूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. जवळा बाजार येथेही कडकडीत बंद पाळून नागेशवाडी ते झीरोफाटा रस्ता बंद करण्यात आला होता.