Maharashtra Election 2019 : कळमनुरीत बंड शमले, वसमतमध्ये कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 06:18 PM2019-10-08T18:18:06+5:302019-10-08T18:20:31+5:30
डखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची वरिष्ठ मंडळी कामाला लागली होती.
- विजय पाटील
हिंगोली : विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपच्या बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची वरिष्ठ मंडळी कामाला लागली होती. त्यात कळमनुरीतील भाजप बंडखोरांनी माघार घेतली असली तरीही वसमतला मात्र बंड कायम राहिले. हिंगोलीतून सेनेच्या बंडखोराने माघार घेतली.
या निवडणुकीपूर्वी युती होणार नसल्याच्याच चर्चा होत्या. त्याच अनुषंगाने मतदारसंघ शिवसेनेला असताना कळमनुरी व वसमतमध्ये भाजपची तर हिंगोली भाजपला असताना शिवसेनेची तयारी सुरू होती. युती न झाल्याने प्रतिष्ठा पणाला लागलेल्या माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे यांनी कळमनुरीतून अपक्ष निवडणूक लढण्याचा चंग बांधला होता. त्यांना रासपचे विनायक भिसेही साथ द्यायला निघाले होते. तर वंचितने उमेदवारी न दिल्याने डॉ.दिलीप मस्केही रिंगणात राहण्याची तयारी करीत होते. या सर्व बाबी शिवसेनेची डोकेदुखी ठरल्या होत्या. मात्र शेवटच्या दिवशी झालेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर या सर्वच दिग्गजांनी माघार घेतली. त्यामुळे मार्ग सुकर झाल्याने सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा जीव भांड्यात पडला आहे. तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर यांच्या एंट्रीने काँग्रेसचे डॉ. संतोष टारफे यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारसंघात तब्बल दहा जणांनी माघार घेतली असून फक्त सात जण रिंगणात आहेत. त्यामुळे तगडी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
हिंगोली मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात
हिंगोली मतदारसंघात भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे, काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर, वंचित बहुजन आघाडीचे वसीम देशमुख, बसपाचे सुरेश गायकवाड यांच्यासह एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे इतर पक्षीय व अपक्षांमुळे लढतीतील रंगत वाढणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे रामेश्वर शिंदे यांनी दबावतंत्र म्हणून दाखल केलेली उमेदवारी ऐनवेळी मागे घेतली आहे.
वसमतमध्ये चौरंगी लढत
वसमत विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा, राष्ट्रवादीचे राजू नवघरे, वंचित बहुजन आघाडीचे शेख फरीद तसेच भाजप बंडखोर तथा अपक्ष शिवाजीराव जाधव या दिग्गजांना आता जिवाचे रान करावे लागणार आहे.
या मतदारसंघात आज शेवटच्या दिवशी ९ जणांनी माघार घेतल्यानंतर १२ जण रिंगणात राहणार आहेत. इतर अपक्ष उमेदवारांमुळे कोणाच्या पायावर धोंडा पडतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपची बहुतांश यंत्रणा जाधव यांच्या मागे उभी राहिली. तर राष्ट्रवादीतील असंतुष्टांचा गट उद्या नेमका काय निर्णय घ्यायचा, हे ठरविणार आहे.