Maharashtra Gram Panchayat Election Results: कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या जिल्ह्याध्यक्षांनी गाव राखले, भाजपचे जिल्हाध्यक्ष अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 07:35 PM2021-01-18T19:35:40+5:302021-01-18T19:37:06+5:30
सगळ्यात धक्कादायक म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजी जाधव यांना मतदार संघात तर फारसे यश मिळालेच नाही.
हिंगोली : कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी आखाडा बाळापूर व नांदापूर या आपल्या मूळ गावावर वर्चस्व राखले असले तरीही भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या गावात भाजपचे पॅनल जोरदार आपटले आहे. दिल्लीत वकिली व नांदेडात कापड दुकानाच्या व्यवसायातच रमलेले भाजप जिल्हाध्यक्ष तरीही जिल्ह्याला वेळ देतील, असे चित्र नाही.
हिंगोली जिल्ह्यात आ.राजू नवघरे यांच्या गावात आधीच बिनविरोध निवड झाली. तर आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या गावात निवडणूकच नव्हती. आ.संतोष बांगर तर हिंगोलीचे रहिवासी आहेत. मात्र त्यांनी अनेक ग्रामपंचायतींत बिनविरोधच ताबा मिळविला. तेच सेनेचे जिल्हाप्रमुखही आहेत. कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या संजय बोंढारे यांनी आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीवरील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. १७ पैकी १३ जागा जिंकल्या. नांदापुरात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलने बाजी मारली. माजी जि.प.सदस्य डॉ.वसंतराव देशमुख यांच्या पॅनलला पराभवाची चव चाखावी लागली.
सगळ्यात धक्कादायक म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजी जाधव यांना मतदार संघात तर फारसे यश मिळालेच नाही. गाव असलेल्या किन्होळ्यातच ते दणकून आपटले. भाजपच्या जि.प.सदस्यांचे पती बालाजीराव जाधव यांच्या नेतृत्वात येथे पॅनल होते. मात्र सामान्यांनी भाजपच्या पॅनलला झिडकारले. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्याचा दौरा करून सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या येतील, असा दावा ज्या जिल्हाध्यक्षांच्या भरवशावर केला, त्यांच्याच गावात कौल विरोधात गेला. त्यामुळे भाजपची जिल्ह्यात पुन्हा बिकट परिस्थितीकडे वाटचाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी तरी आपल्या मतदारसंघात काही ग्रामपंचायतींत भाजपला यश मिळवून देण्यात वाटा उचलल्याचे दिसत आहे.