Maharashtra Gram Panchayat Election Results: वंचितने दिला 'फॉरेन रिटर्न' डॉक्टरेट उमेदवार; मतदारांनी अख्ख्या पॅनलला दिले भरघोस मतदान
By सुमेध उघडे | Published: January 18, 2021 03:31 PM2021-01-18T15:31:48+5:302021-01-18T16:34:43+5:30
हिंगोली तालुक्यातील दिग्रसवाणी ग्रामपंचायत निवडणूकीत वंचितच्या पॅनलने नऊ पैकी आठ ठिकाणी दणदणीत विजय प्राप्त केला.
हिंगोली : जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे नऊ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे या स्वीडनमधून पॉलिटिकल सायन्समधील पीएचडी प्राप्त उमेदवार होत्या. मतदारांनी प्रस्थापित पक्षांचे उमेदवार डावलून डॉ. चित्रा यांच्यासह त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले असून ८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत.
आदिवासी समाजातील डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे हे दांपत्य ८ वर्षे विदेशात होते. त्यांनी स्वीडन, जपान आदी देशांमध्ये वास्तव केले आहे. डॉ. चित्रा ह्यांना पाच भाषा अवगत आहेत. भारतात परतल्यानंतर दाम्पत्य दिग्रसवाणी गावात सातत्याने सामाजिक कार्य केले. ग्रामपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पुरस्कर्त ग्राम विकास आघाडीतर्फे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. विशेष म्हणजे, सरपंचपदाची निवडणूक थेट होत नसली तरी वंचितच्या ग्राम विकास आघाडीने डॉ. चित्रा यांनाच सरपंचपदाचा उमेदवार जाहीर करूनच प्रचार केला. तसेच त्यांच्या आघाडीत महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. याचा सकारात्मक संदेश जात मतदारांनी त्यांच्या पॅनलला भरघोस मतदान केले. ९ पैक्की ८ जागांवर ग्राम विकास पॅनलने विजय प्राप्त केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. पॅनेलच्या डॉ. चित्रा कुऱ्हे, सुभाष खंदारे, सुनीता खंदारे, मिना वसेकर, अनिता आढळकर, उज्वला नायकवाल, साळूबाई पाईकराव, हिम्मत खंदारे या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. विजयानंतर डॉ. चित्रा यांनी मतदारांचे आभार मानून सर्व सदस्य मिळून वचननामा लागू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
वंचितांचा वचननामा मांडून केला प्रचार
गावच्या विकासाचा रोडमॅप मांडणार वंचितांचा वचनानामा पुढे ठेऊन पॅनलने प्रचार केला. भ्रष्ट्राचार मुक्त ग्रामपंचायत, दारु मुक्त आणि डिजिटल ग्रामपंचायत, सौरऊर्जेचा वापर, मुबलक व स्वच्छ पाणी, आरोग्य, दिवाबत्ती, महिला आरोग्य आणि रोजगार अश्या अनेक मुद्यांना घेऊन राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे संकल्पना असलेल्या ग्रामविकासाची मांडणी केली. प्रचारात देखील विरोधात उभे असलेल्या उमेदवार किंवा पॅनल बद्दल टिका न करता विकासाचा अजेंडा मांडला. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत दारू, पार्टी असा प्रकार कुठेही होऊ दिला नाही.