हिंगोलीत विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा
By विजय पाटील | Published: March 8, 2024 06:33 PM2024-03-08T18:33:03+5:302024-03-08T18:33:15+5:30
मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक जमले होते. तेथून घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
हिंगोली : विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.विविध घोषणा देत ग्रामीण भागातून आलेल्यांनी मोर्चात सहभाग नोंदविला.
महाविकास आघाडीचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, भाऊराव पाटील गोरेगावकर, दिलीप चव्हाण, संदेश देशमुख, गोपू पाटील, परमेश्वर मांडगे, श्यामराव जगताप, आनंदराव जगताप, गजानन कावरखे, अनिल नेनवाणी, प्रकाश थोरात आदींचा सहभाग होता.
मोर्चेकरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यानजीक जमले होते. तेथून घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या ठिकाणी मान्यवर नेत्यांची भाषणे झाली. ३३ केव्ही वीज केंद्र नर्सी नामदेव, पुसेगाव, पांगरी येथे वाढीव ट्रान्सफार्मर बसविणे, शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा देणे, रोही, हरण, डुकर, वानरे व इतर रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा, महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे, त्यांना यापासून दिलासा देण्याची मागणीही केली. तर शिक्षण व आरोग्याच्या असुविधेमुळे जनता त्रस्त आहे. मराठा, धनगर आरक्षणासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी अथवा हाताला काम देण्यात यावे. इव्हीएम मशीनवर मतदान घेऊ नये. मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, निराधारांचे प्रश्न सोडवा आदी मागण्या होत्या.