परजिल्ह्यातील उमेदवारांवर महावितरणची मेहरनजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:34 AM2018-11-24T00:34:03+5:302018-11-24T00:34:17+5:30
वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी हिंगोलीत मात्र परजिल्ह्यातील उमेदवारांची यादी लागल्याने तक्रारींचा सूर वाढला आहे. खा.राजीव सातव यांच्याकडे तक्रारी आल्याने त्यांनीही यात स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे अन्यथा हा मुद्दा उचलण्यात येईल, असा इशारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी हिंगोलीत मात्र परजिल्ह्यातील उमेदवारांची यादी लागल्याने तक्रारींचा सूर वाढला आहे. खा.राजीव सातव यांच्याकडे तक्रारी आल्याने त्यांनीही यात स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे अन्यथा हा मुद्दा उचलण्यात येईल, असा इशारा दिला.
महावितरणच्या वतीने शिकाऊ वीजतंत्री व तारतंत्री पदाच्या एका वर्षाच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची भरती होत आहे. यामध्ये ५ ते ७ हजारांपर्यंतच्या वेतनावर उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या भरतीत बहुतांश ठिकाणी स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील उमेदवारांना इतर जिल्ह्यात संधी मिळाली नाही. मात्र हिंगोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत खा.राजीव सातव यांनाही शिष्टमंडळ भेटले. त्यात इतर जिल्ह्यांच्या याद्याच पुराव्यादाखल दाखविल्या. त्यात जिल्ह्यातील उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे सातव म्हणाले, आपल्या जिल्ह्यात प्राधान्य नाही अन् इतर जिल्ह्यातही नोकरी मिळणार नसेल तर येथील मुलांनी जायचे कुठे? कोणत्या तरी एका धोरणावर ठाम राहून महावितरणने भरती करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. काँग्रेसचे आमदार विधिमंडळातही हा मुद्दा उपस्थित करतील.
याबाबत अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात सर्वत्रच भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. आॅनलाईन अर्ज करायचे होते. गुणवत्तेनुसारच भरतीचा आदेश आहे. जिल्ह्यात प्राधान्याचा विषय नाही. मात्र कुणी चूक केली म्हणून आम्ही का करावी?