संचालक पोले खुन प्रकरणातील मुख्य आरोपी दहा महिन्यानंतर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 06:20 PM2018-10-09T18:20:07+5:302018-10-09T18:20:47+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जराव पोले खुन प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीस दहा महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली.
सेनगाव (हिंगोली ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जराव पोले खुन प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीस दहा महिन्यानंतर पोलिसांनीअटक केली.
हरिभाऊ सातपुते ( रा.कंरजी ता.जिंतूर ) असे या फरार आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील वडहिवरा येथील माजी पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालक सर्जराव पोले (५५) यांचे एक जानेवारीला अपहरणकरून खुन करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून अत्यंत शिताफीने सुपारी देवून करण्यात आलेल्या खुन प्रकरणाचा सेनगाव पोलीसांनी ४८ तासात उलगडा केला होता.
या प्रकरणात पोलीसांनी रतन हरिभाऊ खटके रा.रामपुरी ता.पाथरी सह यांच्या विजय देवकर,हरीष बाबुराव मिरेकर ,इम्रान युनूस शेख ( सर्व रा.नाशिक ) या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र यातील मुख्य आरोपी हरिभाऊ सातपुते, शिबु आप्पा पुचारी ( रा.नाशिक ) हे फरार होते. आज सकाळी पोलीसांच्या शोध मोहिमेला यश मिळाले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी सातपुते यास नांदेड रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक सरदार सिंह ठाकूर, पोलीस कर्मचारी एम.एम.टाले, अनिल भारती सह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.