वाहनातच मक्याला फुटले कोंब; १३० वाहने ७ दिवसांपासून केंद्राच्या परिसरात उभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 14:04 IST2020-08-04T13:53:29+5:302020-08-04T14:04:22+5:30
संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून रस्ता रोको आंदोलन केले. तरी काही उपयोग झाला नाही.

वाहनातच मक्याला फुटले कोंब; १३० वाहने ७ दिवसांपासून केंद्राच्या परिसरात उभी
- फकिरा देशमुख ।
भोकरदन (जि. जालना) : बंद पडलेले मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू होईल, या आशेवर शेतकऱ्यांचा मका असलेली तब्बल १३० वाहने केंद्राच्या परिसरात उभी आहेत. विशेष म्हणजे गत सात दिवसांपासून उभ्या असलेल्या या मक्याला आता पोत्यातच कोंब फुटू लागले आहेत. काहींनी किरायाने खोली घेऊन त्यात मक्याची साठवणूक केली आहे. अद्यापही तब्बल २० हजार क्विंटल मक्याची खरेदी होणे बाकी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
बाजार पेठेत मका चक्क १ हजार ते १२०० या भावाने खरेदी करण्यात आला. हमी भाव १७६० रूपये देऊन केंद्र व राज्य सरकारने मका खरेदीसाठी जुलै महिन्यात सुरू केली. मात्र पंधरा दिवसात बंद ती बंद करण्यात आली. त्यानंतर २४ जुलै रोजी परत मका खरेदी सुरू केली व ३० जुलै रोजी बंद केली. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. कारण शेतकऱ्यांनी मका विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ‘मका खरेदी केंद्रावर घेऊन या’ अशा आशयाचे ‘एसएमएस’ पाठविण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी २४ जुलै पासून एक हजारापेक्षा जास्त वाहने खरेदी केंद्रावर आणली. काही वाहनातील मका खरेदी झाला. मात्र, ३० जुलै रोजी दुपारीच खरेदी बंद करण्यात आली.
संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून रस्ता रोको आंदोलन केले. तरी काही उपयोग झाला नाही. सध्या पोत्यातील मक्यालाही कोंब फुटत असल्याने नुकसान होत आहे. वाहनांना दिवसाकाठी पाच हजार रूपये भाडे व भाड्याव्यतिरिक्त एक हजार रूपयांची खुंटी लागत आहे. त्यामुळे ७ हजाराचा भुर्दंड बसत आहे.
३१ हजार ५७६ क्विंटल मका खरेदी
शासनाने ३० जुलै रोजी मका खरेदी बंद केली. त्यावेळी तालुक्यातील ३१० वाहने केंद्राबाहेर उभा होती. आजवर ३१ हजार ५७६ क्विंटल मका खरेदी करण्यात आला असून, ३४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. शासनाने परवानगी दिली तर राहिलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी केला जाईल.
- शौकत अली, व्यवस्थापक, मोरेश्वर खरेदी विक्री संघ
प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
शासनाने मका खरेदीला परवानगी दिली तर शेतकऱ्यांची मका प्राधान्याने खरेदी करता येणार आहे. परवानगी वाढवून मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- संतोष गोरड, तहसीलदार, भोकरदन