निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रमुख पक्षांचा डाव उधळला; ४ बाजार समितीसाठी ५४३ अर्ज
By विजय पाटील | Published: April 3, 2023 05:23 PM2023-04-03T17:23:41+5:302023-04-03T17:24:24+5:30
जय, पराजयाची गणिते न लावता या मंडळींना उन्हाळ्यात दौरे करून घाम फोडायची तयारी
हिंगोली : भाजपशी हातमिळवणी करून ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुका बिनविरोध करण्याचा चालविलेला डाव इतर पक्षांनी उधळून लावल्याचे दिसत आहे. हिंगोली बाजार समितीसाठी तब्बल १३७ तर सेनगावात १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात चार बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. यामध्ये जवळा बाजार कृषी उत्पन्नन बाजार समितीसाठी सर्वाधिक १८४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सेनगावात तब्बल १५१ अर्ज आले. हिंगोलीतही १३७ अर्ज दाखल झाले आहेत. कळमनुरीत सर्वांत कमी ७१ अर्ज आले आहेत.
हिंगोली व जवळा बाजार या दोन बाजार समित्या धनवान आहेत. त्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. हिंगोली व सेनगाव बाजार समिती बिनविरोध करण्याचा प्रमुख पक्षांचा डाव आता इतर पक्षांनी हाणून पाडल्याचे दिसत आहे.
जय, पराजयाची गणिते न लावता या मंडळींना उन्हाळ्यात दौरे करून घाम फोडायची तयारी केल्याचे दिसत आहे. आता माघारीसाठी बराच मोठा काळ आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. मात्र अनेकांनी बिनविरोध निवडणुका होवू नये म्हणून तर काहींनी आपल्या पक्षाने घेतलेल्या मोजक्या जागांमध्ये बिनविरोध उमेदवार म्हणून संधी का देत नाहीत? म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे निवडणुका तर अटळ दिसत आहेत.