शालेय पोषण आहार रेकॉर्ड बनविण्याचे रखडले मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:58 AM2018-04-18T00:58:09+5:302018-04-18T00:58:09+5:30
शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शालेय पोषण आहार योजनेच्या रेकॉर्डची कामे करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे. या कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा शंभर रूपये याप्रमाणे वर्षाकाठी १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांच्या खात्यावर मानधनच जमा झाले नाही. याबाबत शिक्षण खात्यातील संबंधित विभागाला विचारले असता, बिले तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेच्या कामात अनियमता हे नित्याचेच बनले आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली आहे. जिल्हाभरात जि. प. च्या शाळांमध्ये जवळपास ८६९ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. या सर्व शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. सदर योजनेची लेखा-जोखा ठेवण्याच्या कामाची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. शासनाकडून उपलब्ध झालेला तांदूळ, धान्यादी माल व इतर माहितीचे रेकॉर्डची कामे मुख्याध्यापक करतात. सदर कामासाठी मुख्याध्यापकांना दरमहा १०० रूपये म्हणजेच १ हजार रूपये मानधन दिले जाते. परंतु शासनाकडून निधी उपलब्ध होऊनही अद्याप एकाच्याही खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली नाही. शिक्षण विभागातील शलेय पोषण आहार विभागाकडे याबाबत माहितीही उपलब्ध नाही. केवळ बिल तयार करण्याची कामे सुरू असल्याचे टोलवा-टोलवी उत्तरे ऐकवयास मिळत आहेत.
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शासनाकडून दिला जाणारा शालेय पोषण आहार योजनेच्या तांदुळाचा पुरवठा वेळेत होत नाही. मागील पंधरा दिवसांपासून शाळेत तांदूळच उपलब्ध नसल्यामुळे मध्यान्ह भोजनापासून विद्यार्थी वंचित आहेत. अन् आता उन्हाळ्याच्या सुट्यांत तांदूळ वाटपाची
प्रक्रिया मागील दोन दिवसांपासून सुरू केली. मात्र आता शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असल्याने तांदूळ सांभाळण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येणार हे निश्चित आहे. ऐन सुट्यांच्या कालावधी आता तांदळाचा पुरवठा केला जात आहे.
शालेय पोषण आहारच्या तांदूळ वाटप केला जात आहे. आणि मे महिन्यात शाळांना सुट्याही लागणार आहेत. त्यामुळे शाळेतील तांदूळ सांभाळण्याची जबाबदारी वाढली आहे.