पावसाळा की उन्हाळा हेच कळेना! मामा तुम्हीच सांगा, लग्नामध्ये कोट घालू की रेनकोट..?
By विजय पाटील | Published: May 5, 2023 04:07 PM2023-05-05T16:07:13+5:302023-05-05T16:13:23+5:30
अचानकपणे येत असलेल्या अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात बाधा येऊन वऱ्हाडी मंडळींची विचारपूस करण्याऐवजी पावसाकडेच पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
हिंगोली: गत महिनाभरापासून अवकाळी पाऊस अधून-मधून सुरूच आहे. त्यामुळे लग्नामध्ये कोट घालू की रेनकोट? असा प्रश्न नवरदेव मंडळी आप्तेष्टांना करत आहेत. सकाळी ऊन पडते, दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होते आणि नंतर अवकाळी पाऊस पडायला सुरुवात होते. चैत्र आणि वैशाख हे मराठी महिने लग्नसराईचे असतात. त्यामुळे वधू-वरांकडील आप्तेष्ट तसेच वऱ्हाडी मंडळी लग्नकार्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळतात.
दोन-अडीच वर्षांपूर्वी कोरोनामुळे लग्नकार्य पूर्णत: थांबले होते. आता कोरोना संपुष्टात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात लग्नकार्य सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात व्यत्यय निर्माण होत आहे. चैत्र महिन्यातील तिथी सोयीची असते असे पाहून अनेकांनी मंगल कार्यालय राखीव करून ठेवले आहेत. परंतु, अचानकपणे येत असलेल्या अवकाळी पावसामुळे लग्नकार्यात बाधा येऊन वऱ्हाडी मंडळींची विचारपूस करण्याऐवजी पावसाकडेच पाहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
शहरी भागात विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालय, हॉल आदींची व्यवस्था असते. परंतु, ग्रामीण भागात मात्र मोकळ्या जागेत किंवा गावाशेजारील शेतामध्ये विवाह सोहळा होतो. परंतु, महिनाभरापासून अवकाळी पाऊस अधून-मधून हजेरी लावत असल्याने वऱ्हाडी मंडळींची फजिती होत आहे.