'वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा'; भर पावसात शेतकऱ्यांचा विभागीय वनअधिकारी कार्यालयावर मोर्चा
By रमेश वाबळे | Published: July 21, 2023 06:37 PM2023-07-21T18:37:22+5:302023-07-21T18:37:44+5:30
बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत.
हिंगोली : वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने पिकांची नासाडी होत असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, पिकांच्या संरक्षणासाठी तार कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय वन अधिकारी कार्यालयावर २१ जुलै रोजी स्वाभिमानी शेती बचाओ एल्गार मोर्चा काढण्यात आला. भर पावसात हजारो शेतकरी मोर्चात सहभागी होते.
जिल्ह्यातील बहुतांश भागात वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांवर वन्य प्राणी हल्ला करीत आहेत. शेतकरी व पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना तारकुंपन, सौर उर्जा कुंपन उपलब्ध करून द्यावे, या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील गोरेगावकर, गजानन कावरखे, दामूअण्णा इंगोले, नामदेव पतंगे, गोविंद भवर आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी विभागीय वन अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा इंदिरा चौक, नांदेड नाका, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे रेल्वे उड्डाणपुलावरून विभागीय वन अधिकारी कार्यालयावर धडकला. रिमझिम पावसातही हजारो शेतकरी सहभागी झाले होते. वन अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर वन अधिकाऱ्यासोबत चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तगडा पोलिस बंदोबस्त
यावेळी पोलिस प्रशासनच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रूग्ण वाहिका, अग्निशमन बंब यासह ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
तार कुंपन मिळालेच पाहिजे...
मोर्चात सहभागी पदाधिकारी, शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी तारकुंपन मिळावे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो आदी घोषणा सहभागी मोर्चेकऱ्यांकडून देण्यात येत होत्या.