रेशनकार्डवरील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी करणे बंधनकारक; आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:04 PM2024-11-09T14:04:28+5:302024-11-09T14:05:13+5:30
ई-केवायसी करणे बंधनकारक ; तिसऱ्यांदा वाढवली मुदत
हिंगोली : प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ ऑक्टोबर होती. परंतु आता केंद्र शासनाकडून प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली असून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
सध्या शासकीय योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकेचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो. प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांकडे असणाऱ्या रेशनकार्डसाठीही ई- केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आले होती. मात्र या मुदतीत संपूर्ण लाभार्थ्यांची ई-केवायसी झालेली नसल्याने आता केंद्र सरकारने या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.
सरकारने काही महिन्यांपूर्वी केशरी, पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्डधारकांनी ई- केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. आतापर्यंत दोन वेळेस ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
रेशन दुकानांमध्ये केली आहे सुविधा...
रेशनकार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर परिसरातील स्वस्त धान्य दुकानातील फोर-जी ई-पॉस मशीनने ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
ई-केवायसी करणे बंधनकारक...
प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. तसे न केल्यास संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी...
जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी. या प्रक्रियेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून कोठूनही ई-केवायसीची प्रक्रिया लाभार्थ्यास पूर्ण करुन घेता येते. तसेच लाभार्थ्यांनी वेळोवेळी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.
- राजेश पुंजल, जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली