सगेसोयरेसह १३ जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा भेट थेट मुंबईत होईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 05:41 AM2024-07-07T05:41:59+5:302024-07-07T05:44:39+5:30
हिंगोलीच्या मराठा आरक्षण संवाद रॅलीत मनोज जरांगे यांचा इशारा
हिंगोली : सरकारने आता मराठा समाजाचा संयम पाहू नये. १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण द्यावे व सगेसोयरे कायदा अमलात आणावा, अन्यथा त्यानंतरची भेट थेट मुंबईत होईल, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी हिंगोलीत संवाद रॅलीदरम्यान दिला.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीला ६ जुलैला हिंगोलीतून प्रारंभ झाला. यावेळी मराठा समाजबांधवांशी संवाद साधताना जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळांवर कडाडून टीका केली. भुजबळांचे ऐकून मराठ्यांचे नुकसान करू नका, नाही तर या सरकारला जड जाईल. मराठ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर २८८ पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून येऊ देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
जोर कमी झालेला नाही
सरकार मराठा समाजाला कमजोर समजत असेल तर ते चूक करीत आहे. आमचा जोर कुठेच कमी झाला नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेत आहोत.
ओबीसी समाजाने सगेसोयरे अधिसूचना स्वीकारायला हवी. ओबीसी व मराठा समाजाबद्दल सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे - चंद्रकांत पाटील, मंत्री