पीकविमा लाभापासून अनेक शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:25 AM2021-01-04T04:25:18+5:302021-01-04T04:25:18+5:30
गोरेगाव : यंदा अतिवृष्टीमुळे खरिपाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असताना पीकविमा मंजूर झाला. परंतु, वेळेत क्लेम दाखल केला नसल्याने ...
गोरेगाव : यंदा अतिवृष्टीमुळे खरिपाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असताना पीकविमा मंजूर झाला. परंतु, वेळेत क्लेम दाखल केला नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर पीकविमा लाभापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे गोरेगावसह परिसरात ऐकवयास मिळत आहे.
गोरेगावसह परिसरात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतजमिनी खरडून शेतीपिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. शेतकऱ्यांना यंदा खरीप हंगामात उत्पन्न घटीचा फटका सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले. खरीप हंगामाचा पीकविमासुध्दा मंजूर झाला आहे. अनुदान आणि पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा झाली असून वाटपही सुरू आहे. हेक्टरी २० हजार रुपयांच्या जवळपास पीकविमा रक्कम मंजूर झाली असूनही वेळेत विम्यासाठी ऑनलाईन क्लेम दाखल केले नसल्याने विमा रक्कम बँक खात्यात जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांवर पीकविम्याच्या लाभांपासून वंचित रहावे लागत आहे.
पीकविमा भरुनही वेळेत ऑनलाईन क्लेम दाखल करू न शकल्यामुळे लाभापासून वंचित राहावे लागल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात झालेले सार्वत्रिक नुकसान बघता पीक विम्याचा सरसकट लाभ देण्याची मागणी वंचित शेतकऱ्यांमधून होत आहे.