मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द 

By रमेश वाबळे | Published: February 16, 2024 07:20 PM2024-02-16T19:20:48+5:302024-02-16T19:21:33+5:30

१६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली.

Maratha Reservation Movement; Bus services stopped, 932 trips of all three Agars in Hingoli cancelled | मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द 

मराठा आरक्षण आंदोलन; बससेवा ठप्प, हिंगोलीत तिन्ही आगारांच्या ९३२ फेऱ्या रद्द 

हिंगोली :मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून तत्काळ अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी १६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर वसमत तालुक्यातील खांडेगाव नजीक बस पेटविण्यात आली. तसेच शिरडशहापूर नजीक दोन बसेसवर दगडफेक झाल्याने जिल्ह्यातील तिन्ही आगारांनी खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवली. दिवसभरात ९३२ बसफेऱ्या रद्द झाल्या.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी समाजबांधव मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. यासाठी विविध माध्यमांतून आंदोलने झाली. मध्यंतरी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढला. परंतु, त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप मराठा समाज बांधवांतून होत आहे.

सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून तत्काळ अंमलबजावणी करावी, मराठा समाज बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून कायद्यात रूपांतर करावे, हैदराबाद गॅझेट, बाॅम्बे गॅझेट स्वीकारावे, यासह इतर मागण्यांसाठी १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे-पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा आणि सरकारने आरक्षणाच्या अनुषंगाने असलेल्या मागण्या निकाली काढाव्यात, यासाठी आंदोलने सुरू आहेत.

१६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान वसमत तालुक्यातील खांडेगाव नजीक वसमत आगाराची बस पेटविण्यात आली. तर शिरडशहापूर जवळ दोन बसेसवर दगडफेक झाली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. परंतु, या घटनेमुळे खबरदारी म्हणून हिंगोली, वसमत व कळमनुरी आगारांनी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिवभरात या आगारांच्या जवळपास ९३२ फेऱ्या रद्द झाल्या. यात हिंगोली आगार ४०६, वसमत ३५०, कळमनुरी आगाराच्या १७६ बसफेऱ्या रद्द झाल्या. बसस्थानक, आगारांमध्ये पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता.

प्रवाशांची उडाली तारांबळ...
सकाळपासूनच बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाल्याचे पाहावयास मिळाले. हिंगोली आगार प्रशासनाच्या वतीने सकाळच्या चार फेऱ्या वगळता इतर सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तसेच बाहेरील आगारांतून आलेल्या बसेसही या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Web Title: Maratha Reservation Movement; Bus services stopped, 932 trips of all three Agars in Hingoli cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.