बाजार समिती प्रशासकाच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:09 AM2018-09-16T00:09:20+5:302018-09-16T00:09:34+5:30
संचालक मंडळ बरखास्त झालेल्या सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून सहाय्यक सहाय्यक निबंधक अधिकारी एम.ए. भोसले यांनी सूत्रे स्वीकारले असून निवडणुकीचा माध्यमातून आलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराचा अध्याय अखेर संपुष्टात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : संचालक मंडळ बरखास्त झालेल्या सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक म्हणून सहाय्यक सहाय्यक निबंधक अधिकारी एम.ए. भोसले यांनी सूत्रे स्वीकारले असून निवडणुकीचा माध्यमातून आलेल्या संचालक मंडळाच्या कारभाराचा अध्याय अखेर संपुष्टात आला आहे.
तडजोड व सत्ता संघर्षाच्या राजकारणातून सेनगाव बाजार समितीत मागील अनेक महिन्यांपासून वाद पेटला होता. या धगधगत्या निखाऱ्यावर फुंकर घालून तो तेवत ठेवण्याचेच काम नेतेमंडळी करीत होती. फोफावलेले गटातटाचे राजकारण व सत्तेची लालसा यामुळे सत्ताधारी गटाचे संचालकच एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे राहिली. त्यामुळे निवडणुकीद्वारे निवडून आलेल्या संचालक मंडळाला तीन वर्षांतच बरखास्तीपर्यंतचा टोकाचा प्रवास पहावा लागला. अविश्वास ठराव, ९ संचालकाचे राजीनामे अशा नाट्यमय घटनांनंतर या राजकारणाचा शेवट बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीने झाला आहे. राज्य शासनाने बाजार समितीमध्ये केवळ सातच संचालक राहिल्याने प्रशासकीय दृष्टीने अडचण निर्माण होवू शकते. यामुळे निवडणूक घेण्याचा सूचना देत बरखास्तीचे आदेश काढले.
काही महिन्यांनी पुन्हा निवडणूक होईल. परंतु तडजोडीचे राजकारण करणाºया तालुक्यातील राजकीय मंडळींसमोर पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवली तर काय करायचे? असा यक्षप्रश्न कायम आहे. त्याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज आहे. राजकीय प्रगल्भतेचा अभाव व सत्तापिपासूंची चंगळ बाजार समितीला मारक ठरली आहे. लोकनियुक्त संचालक मंडळ असले तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वर्षच कारभार पाहू शकले. सहकाराच्या राजकरणात आर्थिक सुबत्ता आणणाºया बाजार समितीत सत्ताधारी व विरोधक दोहोंचीही तेवढीच फरपट झाली. शेवटी संचालक मंडळ बरखास्त झाल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्रे सहाय्यक निबंधक अधिकारी एम.ए.भोसले यांनी स्वीकारली आहेत. आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या बाजार समितीवर प्रशासकांनी पदभार स्वीकारला असल्याने किमान आता तरी चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.