वसमत येथे बाजार उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:28 AM2018-07-25T00:28:56+5:302018-07-25T00:29:19+5:30

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या वसमत येथे महाराष्टÑ बंदच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. बंदचे अवाहन करण्यासाठी मोठ्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले होते. यावेळी काही युवकांवर दगडफेक झाली. त्यात दोन युवक जखमी झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. आठवडी बाजार भरला असताना जमाव बाजारात आल्याने बाजारातही गोंधळ होवून बाजार बंद झाला.

 Market extinguished at Vasmat | वसमत येथे बाजार उधळला

वसमत येथे बाजार उधळला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या वसमत येथे महाराष्टÑ बंदच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळाला. बंदचे अवाहन करण्यासाठी मोठ्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले होते. यावेळी काही युवकांवर दगडफेक झाली. त्यात दोन युवक जखमी झाले आहे. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. आठवडी बाजार भरला असताना जमाव बाजारात आल्याने बाजारातही गोंधळ होवून बाजार बंद झाला.
वसमत तालुक्यात सर्वत्र बंद पाळला गेला. वसमत आगारातून एकही एसटी बाहेर पडली नाही. बंदचे आवाहन करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे तरुण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. शहरात बाजारपेठ कडकडीत बंद होती मोंढा भागात बंद असलेल्या शटरवर दगडफेक झाली. पारसमल जैन यांच्या इमारतीच्या काचा फोडल्या. सहस्त्रार्जुन पतसंस्थेवर दगडफेक झाली काचा फुटल्या. एसटी आगारातील पासेस आॅफिसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. वसमत बसस्थानकात वृत्तपत्र विक्री करत असलेल्या प्रदीप पोतकर यांच्या वृत्तपत्र विक्री केंद्रावर दगडफेक झाली.
यात प्रदीप पोतकर जखमी झाले, कौठा रोड भागातील शेख हकीम शेख सलीम हे दगडफेकीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. महाराष्टÑ बंदच्या हाकेला वसमत तालुक्यात अनुभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला.
बाळापुरात बंदमुळे बाजारावर परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बाळापूर कडकडीत बंद ठेवण्यात आले. आंदोलकांनी शेवाळा रोड येथे जमून रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. जुने बसस्थानकाजवळ या प्रेताला आंदोलकांनी भडाग्नीही दिला. या कडकडीत बंद व आंदोलनामुळे येथील आठवडी बाजार बंद झाल्याने भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना माल घेऊन परतावे लागले.
आखाडा बाळापूर येथील शेवाळा रोड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन ते तीन तास आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून होते. या आंदोलनात संजय बोंढारे, डी.के.दुर्गे, कृष्णराव पाटील जरोडेकर, देवराव पाटील, जकी कुरेशी, असद कादरी, विठ्ठल पंडित, धनंजय सूर्यवंशी, डॉ. संतोष बोंढारे, डॉ. सचिन देशमुख, डॉ. दुर्गे यांची उपस्थिती होती. गोपाल बोंढारे यांनी सूत्रसंचालन केले तर अनेकांनी भाषणे करून आपल्या तीव्र भावना मांडल्या. बाळापूर कडकडीत बंद ठेवण्यात आले. आठवडी बाजारचा दिवस असल्याने खेड्यापाड्यातून शेतकरी भाजीपाला घेऊन आले होते. पण बंद पाहून त्यांना माल घेऊन परत जावे लागले. कांडली फाटा येथे आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले. कामठा फाटा येथेही आंदोलकांनी रास्ता रोको केले. मयत काकासाहेब शिंदे या आंदोलकास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर मराठा समाजातील आमदारांना श्रद्धांजली अर्पण केली. तर येहळेगाव तुकाराम रस्त्यावरही टायर जाळून व झाडे तोडून टाकत रास्ता रोको आंदोलन केले.
मराठा आरक्षणासाठी कळमनुरीत उत्स्फूर्त बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने २४ जुलै रोजी कळमनुरी बंदचे आवाहन केले होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कळमनुरी शहर कडकडीत बंद होते.
२४ जुलै रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाजासमोर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. तर १० ते १५ मिनिटे रस्ता रोको केले. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार एस.पी. पाठक यांना दिले. जागोजागी मोठी वाहने थांबविली होती. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसत होते. सकाळपासूनच शाळाही सोडून दिल्या होत्या. एकही दुकान सुरू नव्हते.
आगारातून एकही बस गेली नाही. येथील आगारात ३६ बसेस आहेत. त्यापैकी २० बसेस पंढरपूर यात्रेला पाठविल्या आहेत. २४ जुलै रोजी आगारातून एकही बस पाठविली नाही. त्यामुळे आगाराचे ४ लाखांचे नुकसान झाले. २३ जुलै रोजी आगाराचे १३ हजार ७२२ कि.मी. रद्द झालेले आहे. फक्त नाशिक, पुणे व परभणीसाठी तीन बसेसच सोडल्या. बाहेरगावी गेलेली बस एकही परतली नाही. फक्त पंढरपूर येथून एकच बस आली होती. ग्रामीण भागातील बसेस तर तीन ते चार दिवसांपासून बंदच आहेत. खानापूर चित्ता व सावरखेडा येथे मुख्य रस्त्यावर चार ठिकाणी टायर जाळून रस्ता अडविला होता. पोलिसांनी जागोजाग पोलीस बंदोबस्त लावला होता. ट्रक चालकांनी आपले ट्रक जागोजागी उभे केले होते.

Web Title:  Market extinguished at Vasmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.