पती व त्याच्या प्रेयसीच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 07:35 PM2019-06-29T19:35:15+5:302019-06-29T19:35:32+5:30
पती आणि त्याची प्रेयसी दोघेही पोलीस कर्मचारी आहेत
हिंगोली : पती आणि त्याच्या प्रेयसीच्या जाचास कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री नऊ ते दहाच्या वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयत विवाहितेचा पती व त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, हिंगोली शहरातील नाईकनगर भागातील पोलीस कर्मचारी गुलाब सुभाषराव होंडराव (वय ३३) यांची पत्नी राधा गुलाब होंडराव (वय २०) हिने राहत्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. गुलाब होंडराव हे हिंगोली शहर ठाण्यात पोना या पदावर कार्यरत आहेत. परंतु त्यांची पत्नी राधा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली शहर ठाण्यात कार्यरत पोना गुलाब होंडराव व हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे कार्यरत पोलीस शिपाई मीना बबनराव सावळे (वय २८) या दोघांमध्ये अनैतिक संबध होते. याच कारणातून राधा यांचा पती व त्याची प्रेयसी या दोघांनी मिळुन शारीरीक व मानसिक छळ केला. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर राधा होंडराव या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत राधा यांचे वडिल हरिदास सदाशिव राजमाने (रा. होर्टी ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद) यांनी हिंगोली शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुलाब होंडराव व त्याची प्रियसी मीना सावळे या दोघांविरूद्ध राधा यांचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम ३०६, ५०४, ५०६, ३४ भादंविनुसार हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळाची पाहणी...
पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि अशोक घोरबांड, पोउपनि केणेकर आदींनी भेट देऊन पाहणी केली.