CAA : हिंगोलीत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 01:55 PM2019-12-24T13:55:42+5:302019-12-24T13:57:18+5:30
राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने नागरीकत्व संशोधन कायद्याचे समर्थनासाठी मोर्चा
हिंगोली : शहरातील गांधी चौकातून २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला, पुरूष, युवक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर केलेल्या नागरीकता संशोधन कायदा २०१९ नुसार बांगलादेश, आफगाणीस्तान आणि पाकीस्तान या तीन शेजारील देशात राहणाऱ्या हिंदू, ख्रिश्चन, पारशी, जैन, बौद्ध या नागरीकांना तेथे केवळ धर्माच्या आधारावर अत्याचारामुळे प्रताडीत होऊन भारताच्या आश्रयाला आल्यानंतर भारताचे नागरीकत्व स्वीकारता येईल. भारतीय नागरीकत्व स्वीकारण्यासंदर्भात १९५५ मध्ये जो कायदा करण्यात आला होता त्यात दुरूस्ती करण्यात आली आहे. कायद्यानुसार भारतीय नागरीक होण्यासाठी भारतात ११ वर्ष आधिवास आवश्यक होता. या नागरिकत्व संशोधन कायद्यानुसार ११ वर्षाची अट ६ वर्षापर्यंत कमी करण्यात आली आहे. पाकिस्तान, बांगला देशा आणि अफगाणीस्तान या तीन देशातील मुस्लिमेत्तर नागरिकांनी भारतात ५ वर्ष वास्तव्य केले असेल तर त्यांना भारतीय नागरीकत्वासाठी पात्र समजल्या जाणार आहे. तसेच या कायद्यामुळे या देशात एकही घुसखोर शिल्लक राहणार नसल्याची हमी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आहे.
हिंगोली येथील राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने नागरीकत्व संशोधन कायद्याचे समर्थन करीत मोर्चा काढला. तसेच या कायद्याच्या विरोधात देशविरोधी कारवायांच्या माध्यमातून देशात तणाव निर्माण केला जात आहे. या तणाव निर्माण करणाऱ्यांचा कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला.
मोर्चाला परवानगी नव्हती
हिंगोली शहरातील राष्ट्रप्रेमी नागरीक कृती समितीच्या वतीने मोर्चाला परवानगी द्यावी याबाबत हिंगोली शहर ठाण्यात अर्ज केला होता.मात्र पोलीस प्रशासनातर्फे या मोर्चाला परवानगी मिळाली नाही. तरीही कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला होता.