वसमतमध्ये हळद कारखान्यात भीषण आग; कच्चा माल, मशीन जळून कोट्यवधींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 09:59 AM2024-03-25T09:59:30+5:302024-03-25T10:00:09+5:30
आग आटोक्यात आणण्यासाठी नांदेड,परभणी, हिंगोली येथील अग्निशामक दल दाखल
- इस्माईल जहागिरदार
वसमत (जि. हिंगोली):शहरातील परभणी मार्गावर असलेल्या हळद पावडर कारखान्यास सोमवार रोजी पहाटे शॉट सर्किटमुळे भीषण आग लागली. आगीत हळद पावडर, कच्ची हळद, मशनरी जळून १० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली येथील अग्निशमक दल प्रयत्न करत आहे. सकाळी ८.३० वा पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.
वसमत शहरातील परभणी मार्गावरील दादरा पुला जवळ असलेल्या साई अॅग्रो इंडस्ट्रीजचा हळद पावडर कारखाना व गोडाऊनआहे. येथे हळदीपासून पावडर तयार करण्यात येते. तसेच हळद गोडाऊन देखील आहे. आज पहाटे ५ वाजे दरम्यान शॉट सर्किटमुळे कारखान्यात आग लागली. याआगीत कारखान्यातील हळद पावडर, कच्ची हळद, मशनरी आदी साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी शहरातील अग्निशामक दलासह नांदेड, परभणी, हिंगोली येथील अग्निशामक दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. पहाटे लागलेली आग सकाळी ८.३० वाजेपर्यंत आटोक्यात आली नव्हती. या आगीत १० ते १२ कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते,गर्दीही जमली होती.