मार्केट यार्डात मापात पाप! हळदीचा कट्टा २ काट्यांवर मोजला; अडीच किलोचा फरक आला!

By रमेश वाबळे | Published: December 15, 2023 06:59 PM2023-12-15T18:59:12+5:302023-12-15T18:59:39+5:30

हळद मार्केट यार्डात मापात पाप; संशय आल्याने उघड झाला प्रकार

Measure sin in the market yard! A pinch of turmeric measured on 2 forks; There was a difference of two and a half kilos! | मार्केट यार्डात मापात पाप! हळदीचा कट्टा २ काट्यांवर मोजला; अडीच किलोचा फरक आला!

मार्केट यार्डात मापात पाप! हळदीचा कट्टा २ काट्यांवर मोजला; अडीच किलोचा फरक आला!

हिंगोली : हळदीच्या एका कट्ट्याचे वजन दोन वेगवेगळ्या काट्यांवर केले असता, अडीच किलोची तफावत आढळल्याचा प्रकार येथील बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डात १५ डिसेंबर रोजी दुपारी २:३० च्या सुमारास उघडकीस आला. यावरून मार्केट यार्डात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी बाजार समिती प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

येथील बाजार समितीचे संत नामदेव मार्केट यार्ड मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दूरवरून शेतकरी हळद विक्रीसाठी येतात. हंगामादरम्यान मार्केट यार्डात सरासरी ३ ते ४ हजार क्विंटलची आवक असते, तर सध्या सरासरी ६०० ते ८०० क्विंटल हळद विक्रीसाठी येत आहे. १५ डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील समगा येथील शेतकरी बालाजी सरकटे यांनी ६५ कट्टे हळद विक्रीसाठी आणली होती. बिट झाल्यानंतर इलेक्ट्राॅनिक काट्यावर हळद मोजणीला सुरुवात झाली. मापारी विनायक बांगर यांच्या उपस्थितीत मोजमाप सुरू होते. परंतु यादरम्यान शेतकरी सरकटे यांना हळदीचे वजन कमी भरत असल्याबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी ४५ किलो ७०० ग्राम वजन भरलेला तोच कट्टा जवळच असलेल्या दुसऱ्या काट्यावर मोजला असता, ४८ किलो २०० ग्राम भरला. एका कट्ट्यामागे तब्बल २ किलो ५०० ग्राम वजन कमी भरत असल्याचे उघड झाल्यानंतर शेतकऱ्याने संताप व्यक्त केला.

‘त्या’ काट्यावर तीन शेतकऱ्यांच्या हळदीचे आधीच झाले होते मोजमाप...
शेतकरी बालाजी सरकटे यांच्या हळदीच्या मोजमापापूर्वी चार शेतकऱ्यांची हळद त्याच काट्यावर मोजण्यात आली होती. सरकटे यांची हळदी कट्ट्यामागे अडीच किलोने कमी भरत असल्याचे उघड झाली. यावरून त्या चार शेतकऱ्यांची हळद मोजतानाही गोंधळ झाला असावा, असा संशय मार्केट यार्डात शेतकरी व्यक्त करीत होते.

मापारी म्हणतात; आमचा काय दोष?
मार्केट यार्डातील सर्व वजन काटे बाजार समितीचे आहेत. त्या काट्याची वेळोवेळी तपासणी करणे, ते व्यवस्थित सुरू आहेत की नाहीत हे पाहणे गरजेचे आहे. मापारी केवळ शेतमालाचे वजन करून देतो, यात मापाऱ्याचा काय दोष? असे म्हणून मापाऱ्यांनी हात वर केल्याचे पाहावयास मिळाले.

बाजार समितीच्या वतीने पंचनामा...
शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराचा पंचनामा केला. यामध्ये मापारी, शेतकऱ्याने किती कट्टे विक्रीसाठी आणले होते, यासंदर्भात माहिती घेण्यात आली. सदर पंचनामा बाजार समिती सचिवांकडे देणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Measure sin in the market yard! A pinch of turmeric measured on 2 forks; There was a difference of two and a half kilos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.