‘रामलीला’वरील जागेसाठी मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:06 AM2018-01-24T01:06:56+5:302018-01-24T01:07:13+5:30
येथील रामलीला मैदानावर किरकोळ विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवी नियमावली तयार करण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला असल्याचे आ.रामराव वडकुते यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील रामलीला मैदानावर किरकोळ विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवी नियमावली तयार करण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला असल्याचे आ.रामराव वडकुते यांनी सांगितले.
येथील रामलीला मैदानावरील फुटकळ विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. प्रशासनाने ही जागा मोकळी केल्यानंतर पुन्हा ती विक्रेत्यांना द्यायची नाही, अशी भूमिका घेतली होती. तर या जागेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निविदाही काढली होती. दरम्यान, याबाबत आ.तानाजी मुटकुळे यांनी सुरवातीला प्रयत्न केले. संतोष बांगर यांनीही विक्रेत्यांची सेना नेत्यांशी भेट घडवून दिली. मात्र आ.रामराव वडकुते यांनी हा प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात नेला. यावेळी प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, अ.जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांचीही उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याप्रश्नी नियमावली तयार करून संबंधितांना ११ महिन्यांसाठी ही जागा देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तर सेनगावात इमारती पाडताना कोणतीच चौकशी केली नाही. ब्लास्टिंगचा वापर केला. त्यामुळे प्रशासनाची मनमानी दिसून येते. याची उपसचिवांमार्फत चौकशी करू, असे सांगण्यात आले. तर ही जागा त्यांना दिलेली असल्याने नियमित करण्याचे आधीच सांगितले होते.