सभापतीपदासाठी अजूनही बैठकांवर बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:55+5:302021-07-21T04:20:55+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण यांनी मागच्या वेळी बंडखोरी करून हे पद मिळविले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकारणच बदलून गेले ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रत्नमाला चव्हाण यांनी मागच्या वेळी बंडखोरी करून हे पद मिळविले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेतील राजकारणच बदलून गेले होते. शिवाय त्यांच्या वाट्याला कृषी सभापतीपद येण्याची शक्यता असताना तेथेही त्यांनी खेळी खेळून शेवटी शिक्षण सभापतीपद पदरात पाडून घेतले. मात्र, ज्या सदस्यांच्या मदतीवर हे घडले, तेच विरोधात गेल्याने शेवटी पदही गमवावे लागले. मात्र, मागच्या निवडीच्या वेळी झालेल्या एकंदर राजकारणाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. शिवाय अनेक सदस्यांच्या निष्ठा बदललेल्या असल्याने यावेळी काहीतरी विपरित घडण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या वर्तुळातून वर्तविली जात आहे. मात्र, संख्याबळाचा हा खेळ जुळविणे तेवढे सोपे नसून, यात शिवसेनाच शेवटी किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे, हे स्पष्ट आहे. शिवसेनेकडून ज्या नावाला हिरवी झेंडी मिळाली, त्याला राष्ट्रवादीने पुढे केले तर सगळे काही सुरळीत होण्याची शक्यता आहे. तसेही काँग्रेसचे कैलास साळुंके यांनीही आता जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांची ही धडपड त्यांना कुठे घेऊन जाते, हे सगळे भाजपच्या निर्णयावर अवलंबून आहे.
जिल्हा परिषदेतील संख्याबळाचा विचार करता शिवसेना १५, राष्ट्रवादी काँग्रेस ११, भाजप ११, अपक्ष ३ व काँग्रेसच्या स्व. राजीव सातव गटाचे ७, तर भाऊराव पाटील गोरेगावकर गटाचे ३ असे ५० सदस्य आहेत. अविश्वासाच्या वेळी शिवसेना फुटली होती, तर भाजपमध्येही एकजूट दिसली नाही. मात्र, शिवसेनेची एकजूट राहिली तर दोन अपक्षांसह १७ पर्यंत संख्याबळ जाते. शिवाय गोरेगावकर गटही त्यांच्या सोबतच जाण्याची शक्यता आहे. बहुमताचा २६ हा जादुई आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीचे सहा सदस्य कधीही एकत्र राहतील, यात शंका नाही. राष्ट्रवादीच्याच चव्हाण यांना बाजूला सारलेले असल्याने त्यांची नाराजी त्या कशा पद्धतीने दर्शवितात, यावर आकड्यात वाढ होण्याची भिस्त आहे, तर या पदावर दावा करणारेही काही नाराजीत गेले तरीही अडचणीचे ठरण्याची भीती नाही. मात्र, साळुंके यांनी सुरुंग लावण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांत ते कितपत यशस्वी होतील? हे अजून गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीकडून आता यशोदा दराडे, संजय कावरखे, रिता दळवी यांच्यासह महादेव एकलारे यांचेही नाव समोर येत आहे.
दोन दिवसांपासून बैठका
या निवडीच्या वेळी सर्वच पक्षांची सावध भूमिका आहे. दोन दिवसांपासून त्यामुळे बैठकांवर बैठका झडत आहेत. प्रत्येकवेळी भाजप महाविकास आघाडीत बिघाडी कशी होईल, याची गणिते आखत जाते. त्यात त्यांना दोनदा बऱ्यापैकी यश आले. यावेळीही त्यांची तीच भूमिका दिसत आहे. तर सातव गट बाजूला पडल्याने तशीही महाविकास आघाडीत बिघाडीच आहे. मात्र, त्यांच्या नसण्यानेही गणित बिघडू नये, यासाठी या बैठका झडत असल्याचे दिसत आहे. अंतिम टप्प्यात दराडे व एकलारे यांच्या नावाची चर्चा रंगू लागली आहे. अजून शिक्कामोर्तब मात्र झाले नाही.