'व्यसनासाठी पुरुषांनी घरातील राशनही विकले'; हतबल महिला दारूबंदीसाठी धडकल्या जिल्हा कचेरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 07:12 PM2020-06-08T19:12:04+5:302020-06-08T19:15:32+5:30
कोरोना महामारीमुळे हाताला कामधंदा नाही, अन् त्यात आता गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे रोजमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गावातील कष्टकरी महिला हतबल झाल्या आहेत.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील केलसुला गावात अवैधरित्या दारूविक्री केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडूनही याबाबत ठोस कार्यवाही केली जात नाही. शिवाय सेनगाव तहसिल कार्यालयातही यापूर्वीच गावातील महिलांनी दारूबंदीचे निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त महिला दारूबंदीसाठी ८ जून रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे गावातील दारूबंदी करावी, या मागणीचे निवेदन दिले.
सेनगाव तालुक्यातील केलसुला येथे अवैधरित्या देशी व गावठी दारू विक्री केली जात असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत, पती दारू पिऊन आल्यानंतर आम्हाला मारहाण करीत आहेत, यावेळी लहान मुलंबाळ भांडण सोडविण्यासाठी येताच त्यांनाही मारहाण केली जाते अशा व्यथा महिलांनी मांडल्या. गावात सर्रासपणे दारू विक्री होत असल्याने तरूणाई व्यसनाधिन बनत आहे. कोरोना महामारीमुळे हाताला कामधंदा नाही, अन् त्यात आता गावात अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे रोजमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या गावातील कष्टकरी महिला हतबल झाल्या आहेत. त्यात प्रशासन दखल घेईना, पोलीस प्रशासनही कार्यवाही करेना त्यामुळे आता गावातील सर्व महिला दारूबंदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे विनंती करण्यासाठी आल्या होत्या.
यानंतरही दखल घेण्यात आली नाही, तर गावातील सर्व महिला जिल्हाकचेरीसमोर उपोषणास बसणार आहेत. तसा इशाराही निवेदनाद्वारे महिलांनी दिला आहे. निवेदनावर रूख्मिना अंभोरे, पुष्पा अंभोरे, शोभा खेलबाडे, त्रिशला अंभोरे, लक्ष्मीबाई इंगळे, धु्रपताबाई इंगळे, कांताबाई इंगळे, लक्ष्मीबाई इंगळे, वच्छाबाई लाटे यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांच्या स्वाक्षरी आहेत.
रेशनचे धान्यही विक्री
सध्या टाळेबंदी दरम्यान रेशनकडून मोफत मिळणारे धान्यही घरातील व्यसनी पुरूष विक्री करत आहेत. त्यामुळे आम्ही महिलांनी करावे तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला. गावात सहजपणे दारू उपलब्ध होत आहे, शिवाय दारू विक्रेतेही दमदाटी करीत आहेत, असेही महिलांनी यावेळी सांगितले.