शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:33 AM2021-08-24T04:33:31+5:302021-08-24T04:33:31+5:30
हिंगोली : कोरोनामुळे मागील एक ते दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरीच थांबत आहेत. यामुळे मुलांसह ...
हिंगोली : कोरोनामुळे मागील एक ते दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरीच थांबत आहेत. यामुळे मुलांसह पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. मुलांच्या अभ्यासाची चिंता पालकांना सतावत आहे.
प्राथमिक शाळेसह दहावी, बारावीचे विद्यार्थी परीक्षा न देताच अंतर्गंत मूल्यमापनावर उत्तीर्ण करावे लागले. सध्या काही माध्यमिक शाळा सुरू असल्या तरी प्राथमिक शाळांना अजूनही प्रतीक्षाच आहे. यामुळे मुले सारखी घरात राहून कंटाळली आहेत. त्यांच्या वर्तनात बदल जाणवत असून मोठ्यांविषयीची आदरयुक्त भीतीही गायब झाली आहे. पालकांनाही मुलांच्या अभ्यासाची चिंता लागली असून यातून दोघांचेही मानसिक आरोग्य बिघडत चालले असल्याचे दिसून येत आहे.
मुलांच्या समस्या...
- घरात राहून मुले कंटाळली आहेत.
- झोप, जेवणाचे नियोजन बिघडले
- मोबाईलचा वापर वाढल्याने डोळ्यांवर परिणाम.
- ऑनलाईन अभ्यासामुळे लिखाण, वाचनाची समस्या निर्माण झाली.
- मोबाईलवर गेम खेळण्याची सवय लागली.
पालकांच्या समस्या...
-ऑनलाईन शिक्षणासाठीचे साहित्य खरेदीची चिंता.
- मुले पालकांचे ऐकत नसल्याने पाल्याला शिस्त कशी लावावी, याची चिंता लागली आहे.
- कामाच्या व्यापात मुलांचा अभ्यास घेण्यास वेळ न मिळणे.
- संवाद साधण्यास वेळ न मिळणे.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...
शाळा बंद असल्याने मुले घरी राहत आहेत. त्यामुळे झोप, आहार, खेळावर मर्यादा आल्या आहेत. यातून मुलांचे वजन वाढत असून स्थूलता येत आहे. मोबाईलचा वापर वाढल्याने एकटेपणा जाणवत आहे. यातून त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळापत्रक तयार करून त्याप्रमाणे अभ्यास, खेळ, झोपेविषयीची शिस्त लावावी. लहान-लहान कामे सांगावीत, त्यांचा अभ्यास घ्यावा, किमान एक तास तरी खेळण्यासाठी सोडावे, मुले माेबाईलवर काय पाहतात यावर लक्ष ठेवावे.
- डाॅ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली
पहिली - २२८५२
दुसरी -२३१८५
तिसरी -२२११२
चौथी-२१८७४
पाचवी-२१३४२
सहावी -२१०३४
सातवी-२०७४०
आठवी-२०५३५
नववी-१९५१९
दहावी-१९४०७